नाशिक : महसूलचे कामकाज ठप्प : नागरिकांची गैरसोय | पुढारी

नाशिक : महसूलचे कामकाज ठप्प : नागरिकांची गैरसोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि. 28) पुकारलेल्या एकदिवसीय संपाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला. संपामुळे दिवसभर एकही कर्मचारी कार्यालयाकडे फिरकला नाही. परिणामी 31 मार्चची कामे घेऊन कार्यालयात आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.

गेल्या काही वर्षांपासून महसूल कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. यात नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 वरून 20 टक्के करण्यासह विभागात सहायकांची रिक्त पदे भरणे, पदोन्नती अशा मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी महसूल कर्मचार्‍यांनी 21 मार्चपासून विविध मार्गांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, शासनाकडून अद्यापही मागण्यांची दखल न घेतल्याने सरतेशेवटी महसूल कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि. 28) एकदिवसीय संपाचे हत्यार उपसले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. तालूकास्तरावरही संपाचा परिणाम पाहायला मिळाला. मार्चएण्डिंगच्या धास्तीने कार्यालयांमध्ये कामे घेऊन आलेल्या सर्व सामान्यांना संपामुळे रिकाम्या हाती माघारी परतावे लागले.

जिल्ह्यात महसूल विभागाचे 491 कर्मचारी आहेत. ते सर्व संपात उतरल्याने संप 100 टक्के यशस्वी झाल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेतर्फेे देण्यात आली. दरम्यान, या संपानंतरही शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या 4 तारखेपासून बेमुदत संपाचा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतला आहे.

जिल्ह्यात एकदिवसीय संप 100 टक्के यशस्वी झाला आहे. संपकाळात कर्मचार्‍यांनी राज्यभरात रक्तदान करून शासनाचा निषेध नोंदविला. यानंतरही शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास 4 एप्रिलपासून राज्यातील 22 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जातील.
– नरेंद्र जगताप, सरचिटणीस, म. रा.महसूल कर्मचारी संघटना

संपाचा अधिकार्‍यांना फटका
महसूल कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा फटका अधिकार्‍यांना सहन करावा लागला. कर्मचारी उपलब्ध नसल्याने सोमवारी अधिकार्‍यांना स्वत:च्या दालनाची टाळे उघडावी लागली. तसेच अन्य कामेदेखील स्वत:च करावी लागली.

हेही वाचा :

Back to top button