चिपळूण: वाशिष्ठीच्या उपयोगातून चिपळूणचे पुनर्निर्माण करा : जयंत पाटील | पुढारी

चिपळूण: वाशिष्ठीच्या उपयोगातून चिपळूणचे पुनर्निर्माण करा : जयंत पाटील

चिपळूण पुढारी वृत्तसेवा : वाशिष्ठी नदीमुळे खरेतर चिपळूणला महत्त्व आले. ऐतिहासीक काळामध्ये हे मोठे व्यापारी केंद्र होते. त्यामुळे हा ऐतिहासीक ठेवा जतन करतानाच या शहराचे पुनर्निर्माणाचे काम सुरू झाले आहे. या नदीचा उपयोग करून पुनर्निमाण कसे होईल येईल याला आता प्राधान्य द्यायला हवे.

नदीच्या माध्यमातून पर्यटन, दळणवळण साधने निर्माण करणे महत्त्वाचे आहे. या शहरावर महापुराचे संकट आले. मात्र, या संकटातून संधी निर्माण करण्याची गरज आहे. याचा विचार येथील नागरिकांनी करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी चिपळूण येथे केले. शहरातील हॉटेल अभिरुचीच्या सभागृहात गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते.

सोमवारी (दि. 28) सकाळी 11 वा. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याची पाहणी केली. त्यांच्या हस्ते जलसंपदा खात्याच्या माध्यमातून आलेल्या आठ नव्या पोकलेनचा शुभारंभ झाला. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, चिपळूणवर महापुराचे संकट आले. त्यातून मोठे नुकसान झाले. मात्र, त्यावर मात करून चिपळूणवासीय उभे राहिले आहेत. येथील जनतेच्या रेट्यामुळे शासनाचे लक्ष वधले. आ. शेखर निकम यांनी त्यात महत्त्वाचे काम केले. म्हणून शासनाने तत्काळ दहा कोटी रूपये शासनाने गाळ काढण्यासाठी दिले. यातील पहिल्या टप्प्यातील दोन कोटी तर उर्वरित निधी आता देण्यात येणार आहे. येत्या मे महिन्यापर्यंत 7 लाख 80 घ.मी. गाळ काढण्याचे उद्दीष्ट आहे. ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत गाळ काढण्याचे काम सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जलसंपदा खात्याने 17 कोटी 56 लाखातून चिपळूण व महाडसाठी नवेकोरे 14 पोकलेन व 30 टिपर खरेदी केले आहेत. त्यातील सात टीपर चिपळुणात दाखल झाले असून लवकरच पंधरा टीपर दाखल होणार आहे. त्यामुळे गाळ काढण्याचा वेग वाढणार आहे.

केंद्र शासनाच्या एजन्सीमार्फत चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी मॉडेल स्टडी करण्यात येणार आहे. त्याच्या प्राथमिक अहवालानुसार काम सुरू झाले असून अंतीम अहवाल आल्यावर शासन त्या बाबत विचार करणार आहे. शासनाच्या माध्यमातून ‘फ्लड अलर्ट’ यंत्रणा, व्हेदर सेंटर, रडारद्वारे पावसाचे मोजमाप, कोकणातील 26 खोर्‍यांमध्ये आरटीजीएस यंत्रणा, रियल टाईम अलर्ट सिस्टीम आदी यंत्रणा उभारली जाणार आहे. दीड कोटींच्या निधीतून अलर्ट यंत्रणा बसवली जाणार आहे व याला लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले.

आता चिपळूणमध्ये गाळ टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, कंत्राटदारांना रॉयल्टीशिवाय गाळ देता येणार नाही. शेतकरी व स्थानिकांना मात्र मोफत गाळ देण्याचा प्रस्ताव आहे. मंत्रिमंडळात मंजुरीनंतरच असा गाळ देता येईल. आ. शेखर निकम त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सध्या 10 कि.मी.च्या परिसरात गाळ टाक़ण्याची जागा असेल तर मार्ग काढा.

शालेय क्रीडांगणे, देवस्थानच्या जागा, सार्वजनिक ठिकाणी हा गाळ टाकण्याचा विचार करावा. जेवढा गाळ वाशिष्ठी व शिवनदीतून काढला जाईल तेवढे पात्र मोकळे होईल आणि जेवढे पात्र मोकळे होईल तेवढी नदीची जलवहन क्षमता वाढेल हाच महापुरावरील महत्त्वाचा उपाय आहे. त्यातून महापुराचे संकट कमी होईल, असे ना. जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते जलसंपदा विभागातील प्रमुख अधिकार्‍यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी आ. शेखर निकम, माजी आ. रमेश कदम, जलसंपदाचे सचिव रजपूत, कोकण पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. कपोले, मुख्य अभियंता विजय घोगरे, अभियंता वैशाली नारकर, यांत्रिकी विभागाचे अभियंता चिमणे, श्री. जाधव, पाटबंधारे, जलसंपदा व यांत्रिकी विभागाचे अभियंता उपस्थित होते.

आ. निकमांच्या माध्यमातून आदर्श लोकप्रतिनिधी लाभला

महापूर आणि कोरोना काळात येथील आ. शेखर निकम यांनी खूप काम करीत आहेत. संकटाच्यावेळी प्रत्येकाला मदतीचा हात पुढे केला. संकटकाळात त्यांनी खूप मोठी सेवा केली आहे. या शिवाय अनेक कार्यकर्ते उभे केले आहेत. येथील जनतेेने एक चांगला लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठविला आहे. त्यामुळे ते म्हणतील ते विकासकाम आपण पूर्ण करू. त्यांच्या माध्यमातून चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाला तसेच राज्याला एक चांगला लोकप्रतिनिधी मिळाला आहे. त्यांनी येथील नागरिक, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चांगला समन्वय साधला आहे, अशा शब्दांत आ. निकम यांचे कौतुक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी केले.

हेही वाचा

Back to top button