नाशिक : पोलिसांच्या अडवणुकीमुळे नववर्षाच्या स्वागतयात्रा रद्द | पुढारी

नाशिक : पोलिसांच्या अडवणुकीमुळे नववर्षाच्या स्वागतयात्रा रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या नववर्ष स्वागतयात्रा व त्या अनुषंगिक सांस्कृतिक कार्याला परवानगी देण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडून अडवणूक केली जात असल्याने संतप्त झालेल्या नववर्ष स्वागतयात्रा समितीने नववर्षाचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित कार्यक्रमांबाबत सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करूनही कोणत्याही स्वरूपाची परवानगी दिली जात नसल्याने नाशिककरांसह स्वागतयात्रांत सहभागी होणार्‍या कार्यकर्ते व कलाकारांचा हिरमोड झाला आहे.

शहरात दरवर्षी थाटामाटात आणि ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे शहरभर स्वागत केले जाते. त्यासाठी ठिकठिकाणाहून स्वागतयात्रांचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे या स्वागतयात्रा होऊ शकल्या नाहीत. आता सर्व प्रकारचे निर्बंध हटल्याने वाजत-गाजत स्वागतयात्रा काढण्याचे प्रयोजन असतानाच, त्याला नाशिक पोलिस प्रशासनाकडून परवानगी दिली जात नसल्याने या परंपरेला छेद बसला आहे. स्वागतयात्रा तसेच त्या अनुषंगिक अंतर्नाद, महावादन आणि रांगोळी अशा कार्यक्रमांबाबत स्वागतयात्रा समितीने परवानगी मिळण्यासाठी गेल्या 5 मार्च रोजीच पोलिसांकडे कागदपत्रे सादर केली आहेत. असे असताना, पोलिस आयुक्तालयाकडून या कार्यक्रमांना परवानगी दिली गेली नाही.

त्यामुळे या यात्रेत सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांचा आणि कलाकारांचा हिरमोड तर झालाच, शिवाय एक-दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सरावावरही पाणी फेरले गेल्याचे स्वागतयात्रा समितीचे जयंत गायधनी, प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा विषय घेऊन शहरात भव्य-दिव्य रांगोळी साकारण्यात येणार होती, तर अंतर्नाद या कार्यक्रमातूनही त्याविषयी भाष्य केले जाणार होते. मात्र, पोलिस परवानगीअभावी या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही नाशिककरांना मुकावे लागणार आहे.

शासनाने श्वेतपत्रिका काढावी
येथील पोलिस प्रशासनाच्या विरोधात शासनाकडे पत्रव्यवहार केला जाणार असून, शासनाने श्वेतपत्रिका काढून हिंदू धर्मातील सण, उत्सव कोणकोणते हे जाहीर करावे. यापुढे कोणत्याही सण, उत्सव साजरा करण्यासाठी आपण परवानगी मागणार नसल्याचे प्रफुल्ल संचेती, जयंत गायधनी यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
रंगपंचमीबरोबरच आता गुढीपाडवा सणानिमित्त आयोजित स्वागतयात्रा तसेच कार्यक्रमांनाही परवानगी नाकारली जात असल्याने आता पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. संबंधित विषयाबाबत समितीने पालकमंत्र्यांकडेदेखील तक्रार केली आहे. परंतु, पोलिस मात्र पालकमंत्र्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकीकडे परवानगी, दुसरीकडे नकार
सातपूर येथील बारागाडे ओढण्याच्या कार्यक्रमाला एकीकडे परवानगी दिली जात असताना, दुसरीकडे मात्र स्वागतयात्रा व संबंधित कार्यक्रमांना परवानगी दिली जात नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयीदेखील संशय निर्माण होत आहे. कारण असाच अनुभव नाशिककरांना धूलिवंदनानिमित्त काढण्यात येणार्‍या दाजीबा
वीरांच्या वेळीदेखील आला आहे. यासंदर्भात कलाकार सुमुखी अथनी, नितीन वारे, नितीन पवार, महेश महंकाळे आदींनी नाराजी व्यक्त करीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तयारीवर पाणी फेरले
गेलेच शिवाय वेळ आणि पैसादेखील पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही वाचा :

Back to top button