अंटार्क्टिकापासून तुटले दिल्‍लीच्या आकाराचे हिमशिखर | पुढारी

अंटार्क्टिकापासून तुटले दिल्‍लीच्या आकाराचे हिमशिखर

वॉशिंग्टन : पृथ्वीचा ध्रुवीय भाग असलेल्या अंटार्क्टिकातील वाढते तापमान विनाशकारी बनू लागले आहे. प्रचंड उष्णतेने मार्चच्या मध्यालाच भारताची राजधानी दिल्लीच्या आकाराइतके एक बर्फाचे शिखर तुटले आहे. ‘कोंगर आईस सेल्फ’, असे या शिखराचे नाव असून त्याचा आकार 1200 चौरस कि.मी. इतका आहे.

कोंगर आईस सेल्फ हा 15 मार्च रोजी मुख्य भागापासून वेगळा झाला तेव्हा अंटार्क्टिकावरील तापमान उणे 12 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. जे सरासरीपेक्षा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉब लार्टर यांनी सांगितले की, ज्यावेळीपासून आम्ही सॅटेलाईट डेटाचा अभ्यास करत आहोत, तेव्हापासून अंटार्क्टिकापासून इतका मोठा बर्फाचा तुकडा तुटला नव्हता. तसे पाहिल्यास ‘कोंगर’ हा एक बर्फाचा लहान तुकडा होता. ज्याचा आकार गेल्या काही वर्षांपासून कमी कमी होत होता. शेवटी यावेळी तो तुटून वेगळा झाला.
आर्क्टिकप्रमाणेच अंटार्क्टिका हे पृथ्वीवरील सर्वात थंड आणि बर्फाच्छादित ध्रुवीय भाग असून तो वाढत्या तापमानाचा संकटात सापडला आहे. मेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलाराडो’मधील हिमशास्त्रज्ञ टेड स्कामबोस यांच्या मते, अंटार्क्टिकामध्ये इतकी उष्णता यापूर्वी कधीच पडली नव्हती. तर दुसरे शास्त्रज्ञ मॅथ्यू लज्जारा यांनी सांगितले की, ज्यावेळी अशा घटना नजरेस पडतात, त्यातून निश्‍चितपणे चांगले संकेत मिळत नसतात.

अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या रूपात इतके पाणी जमा आहे की, ते वितळल्यास निश्‍चितपणे जगभरात समुद्राची पातळी 200 फुटाने वाढेल. तसेच ‘नेचर’ नामक पत्रिकेतील माहितीनुसार 1880 पासून समुद्राची पातळी सरासरी 9 इंचाने वाढली आहे. यातील सुमारे 33 टक्के पाणी ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकातील बर्फ वितळल्याने निर्माण झाले आहे.

Back to top button