नाशिकला बनविणार बिझनेस फ्रेंडली सिटी : नवनियुक्त आयुक्त पवार यांचा मानस | पुढारी

नाशिकला बनविणार बिझनेस फ्रेंडली सिटी : नवनियुक्त आयुक्त पवार यांचा मानस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. त्या अनुषंगाने नाशिक शहराचा विकास आणि महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या दृष्टीने नाशिक शहराला बिझनेस फ्रेंडली सिटी बनविण्यास माझे प्राधान्य असेल, असा मानस व्यक्त करत शहरवासीयांना उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नाशिक महापालिकेचे नूतन आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.

राज्य शासनाने कैलास जाधव यांची बदली केल्यानंतर नूतन आयुक्त रमेश पवार यांनी गुरुवारी (दि.24) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शहर विकासाच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले. नाशिक शहराला धार्मिक, औद्योगिक, पर्यटन, शेती तसेच शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व आहे. शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पार्किंगसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणे शक्य आहे का याबाबत प्रयत्न केले जातील, असे आयुक्त पवार यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेतील कामांना झालेला विलंब आणि आरोप निदर्शनास आणून दिला असता या संदर्भात स्थानिक नागरिक, महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकार्‍यांबरोबर चर्चा करून समन्वयाने तोडगा काढण्यात येईल, असे सांगत कार्यारंभ देण्यात आलेली कामे सुरू राहतील, असे पवार यांनी नमूद केले. उद्योग, व्यवसाय वाढीसाठी महापालिकेकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्याकरता ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

म्हाडाला अहवाल पाठविणार
कथित म्हाडा सदनिका आणि भूखंड घोटाळ्याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊन गृहनिर्माण महामंडळाला अहवाल सादर केला जाणार असल्याचे आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले. गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी भाजपच्या महत्त्वाकांक्षी नमामि गोदा प्रकल्प तसेच आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क यांसारख्या प्रकल्पांची माहिती घेऊनच त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पवार यांनी सांगितले.

महसूल वाढीसाठी नवनवे स्रोत
महापालिकेच्या महसुलात भरीव वाढ व्हावी यासाठी नवनवे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. त्या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न असतील. कोणत्या विभागामार्फत चांगला महसूल मिळू शकतो, त्याबाबतचा अभ्यास करून कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त पवार यांनी सांगितले.

संस्मरणीय कर्मभूमी ठरेल
शहरासाठी सुंदर रस्ते, स्वच्छ परिसर आणि आरोग्यदायी वातावरण यास आपले प्राधान्य असेल. त्या अनुषंगाने नाशिक शहरात शून्य कचरा संकल्पना राबविणार असल्याचे सांगितले. माझी जन्मभूमी नाशिक जिल्हा आहे. यामुळे मनपा आयुक्तपदावर कार्य करताना जन्मभूमी संस्मरणीय कर्मभूमी कशी ठरेल, यादृष्टीनेच आपली कामगिरी असेल, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button