कोल्हापूरच्या रुग्णालयात मला मारण्याचा कट होता : नितेश राणे | पुढारी

कोल्हापूरच्या रुग्णालयात मला मारण्याचा कट होता : नितेश राणे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

प्रकृती खालावल्यामुळे कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा माझ्या शरीरात चुकीचे औषध टाकून आपल्याला मारण्याचा कट होता, असा खळबळजनक आरोप आ. नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केला. संतोष परब हल्ला प्रकरणात आ. राणे यांना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे, कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात हलवले होते.

त्या संदर्भ देत ते म्हणाले, आपले सीटी एन्जो करणे गरजेचे असल्याचा आग्रह डॉक्टर माझ्याकडे करु लागले. मी त्यांना मला आता असे काही वाटत नाही आहे. माझे बीपी लो होते हे मला जाणवत होते. पण डॉक्टर म्हणाले तुम्हाला सीटी एन्जो करायला सांगितले
आहे. काही कर्मचार्‍यांनी मला येऊन सांगितले की, हे सीटी एन्जो करु नका. हे करण्यासाठी शरीरात इंक टाकावी लागते. ही इंक टाकून तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. तसेच आपला बीपी, शुगर लो असतानाही रात्री अडीच वाजता 200 पोलिस आपल्याला डिस्चार्ज करण्यासाठी पाठवण्यात आले होते, या प्रकरणी गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे असे असेही ते म्हणाले.

नितेश यांचा पेनड्राईव्ह बॉम्ब?

फडणवीस यांच्यानंतर नितेश राणे यांचा पेनड्राईव्ह बॉम्ब समोर येणार आहे. दिशा सालियान हिच्या हत्येचे पुरावे आमच्याकडे आहेत, असे सांगतत आ. राणे म्हणाले, मुंबई पोलिसांच्या तपासावर आमचे प्रश्नचिन्ह आहे. हा तपासा कोणाला तरी वाचवण्यासाठी केला आहे. त्या मुलीला न्याय देण्यासाठी नाही. एका साक्षीदाराचा व्हिडीओ असणारा पेन ड्राईव्ह आपण न्यायालयाच्या माध्यामातून सीबीआयला देणार आहोत, असे राणे म्हणाले.

Back to top button