Mamata Banerjee : आधुनिक बंगालमध्ये एवढा रानटीपणा कोठून आला, ममतांचा संतप्त सवाल

Mamata Banerjee : आधुनिक बंगालमध्ये एवढा रानटीपणा कोठून आला, ममतांचा संतप्त सवाल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (दि.२४) बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई गावाला भेट दिली. या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांना माफी नाही. कोणी कितीही नाटकं करू देत यामध्ये सामील असलेल्यांना अटक केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बोगतुई गावच्या भेटीदरम्यान  दिला. यावेळी त्या संतप्त झाल्याचे दिसून आल्या.

आधुनिक बंगालमध्ये एवढा रानटीपणा असू शकतो, असे मला कधीच वाटले नव्हते. या घटनेत आई आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू होते ही खेदजनक बाब आहे. यामध्ये नक्कीच मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची घोषणा केली. तसेच हत्येमागील कारणांचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घटनास्थळीच ममता यांनी एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याला फोन करून तक्रारींची उत्तरे देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे सांगितले. मला कोणतीही सबब नको आहे. या घटनेत जबाबदार असलेल्यांना अटक व्हावी आणि पोलिस कर्मचार्‍यांच्या चुकीबद्दल शिक्षा व्हावी अशा कठोर शब्दात त्यांनी पोलिसांना सुचना केल्या आहेत. याचबरोबर या घटनेतील साक्षीदारांना पोलिसांनी संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण दिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

Mamata Banerjee : वारसांना नोकरी तर घरांच्या दुरुस्तीसाठी १ लाखांची मदत

ज्यांची घरे जळाली आहेत, त्यांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी ममता बॅनर्जी यांनी १ लाख देण्याचेही सांगितले. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. मागच्या दोन दिवसांपुर्वी बोगतुई गावात काही घरांना आग लावण्यात आली होती, ज्यात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

या घटनेबाबत ममता म्हणाल्या होत्या की, भाजप, डावे पक्ष आणि काँग्रेसचा आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. बीरभूम घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. ठाणे प्रमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. कालपासून पोलिस महासंचालक जिल्ह्यात आहेत, असेही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news