कोल्हापूर : मरणासन्‍न आईच्या स्वप्नासाठी अंध मुलगा सुनील लग्‍नबंधनात | पुढारी

कोल्हापूर : मरणासन्‍न आईच्या स्वप्नासाठी अंध मुलगा सुनील लग्‍नबंधनात

कोल्हापूर : पूनम देशमुख
माझ्या सोनूशी लग्‍न कर गं! त्याचा हात तुझ्या हातात घे … त्याला सुखात ठेव… आयुष्यभर साथ दे… माझी शेवटची इच्छा पूर्ण कर… अशा कॅन्सरग्रस्त आईने केलेल्या आर्त विनवणीतून मंगळवारी अंध कौशल्या आणि सुनील यांचा अनोखा विवाह सोहळा कसबा बावड्यात सायंकाळी पार पडला. अखेरची इच्छा पूर्ण होताना पाहण्यासाठी सुनीलच्या आईने रुग्णालय प्रशासनाच्या परवानगीने उपस्थित राहून मुलगा आणि सुनेला डोळे भरून पाहिले. या अविस्मरणीय अनोख्या विवाहाचे साक्षीदार असणार्‍यांचे डोळे पाणावलेले होते.

सोलापूरची कौशल्या झाली कोल्हापूरची सून

सोलापूरची कौशल्या साठे आणि कोल्हापूरचा सुनील दोडमणी दोघेही अंध. तरीही शासकीय अधिकारी पदाची स्वप्न पाहात दोघेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांची पुण्यातील स्पर्धा परीक्षा केंद्रात भेट झाली. भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झाले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सुनीलच्या आईला म्हणजे 56 वर्षीय बाळाबाई यांना कॅन्सर झाला असून त्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे निदान झाले. सध्या त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडील सुरक्षारक्षक आहेत.

सध्या सुनील स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासोबतच उदरनिर्वाहासाठी शुगरमिल परिसरात केळी आणि नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला सीमा आणि उमा या दोन मोठ्या बहिणी असून त्यांची लग्‍ने झाली आहेत. कौशल्याला एक भाऊ अन् तिघी बहिणी आहेत. दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने हा सोहळा आईच्या साक्षीने साजरा झाल्याचे समाधान कुटुंबासह नातेवाईकांच्याही डोळ्यात दिसत होते.
यापुढील सुख पाहण्यासाठी आपण नसणार, याची खंत सुनीलच्या आईच्या डोळ्यांतील अश्रूंमधून व्यक्त होत होती. सुनीलची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने या कार्यास लागणारा सर्व खर्च, वधू-वरांना कपडे, मंगळसूत्र, जोडवे, हारतुरे, मिठाई व अल्पोपहारचा खर्च उत्तरदायित्व म्हणून मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी केला.

Back to top button