कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ‘कात्रजचा घाट’ दिसण्याची शक्यता | पुढारी

कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 'कात्रजचा घाट' दिसण्याची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रमाणेच (पीडीसीसी) पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावरही (कात्रज दूध) वरचष्मा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी जिल्ह्यात जोरदार फिल्डिंग लावली असली, तरी राखीव मतदारसंघात आणि खेड, जुन्नर या तालुका मतदारसंघात त्यांचा कस लागणार आहे. पुणे जिल्हा दूध संघाची ही निवडणूक त्यामुळे रंगतदार होणार आहे.

दूध संघात काँग्रेसचे संख्याबळ तुलनेने नाममात्र राहिलेले आहे. १६ पैकी ५ संचालक बिनविरोध निवडून आले असले तरी सहकार पॅनेलच्या उर्वरित ११ संचालकांच्या निवडीत राखीव मतदारसंघातील चार आणि तालुका मतदारसंघातील दोन उमेदवारांना निवडून आणण्यात राष्ट्रवादी पक्षनेतृत्वाचा खरा कस लागणार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा दूध संघाची वार्षिक उलाढाल सुमारे ३०० कोटी रुपयांवर आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांशी थेट नाळ जोडलेला दूध संघ हा खेडोपाड्यापर्यंत सर्वपरिचित असून, या संघावरील वर्चस्वासाठी मंत्रालय स्तरापासून लक्ष दिले जात आहे. क्षेत्रिय स्तरावर सूचनाही येत आहेत. संघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असले, तरी राष्ट्रवादीचाच पूर्ण वरचष्मा कसा राहील, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हा बँकेचे काही संचालक आणि दूध उत्पादकांमधील धुरीण कामाला लागलेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांशी आमदारांनीही प्रथमच या निवडणुकीत अधिक रस घेतला असून, आपल्याच सहकार पॅनेलमधील घोषित उमेदवार निवडून येण्यासाठी आटापिटा सुरु केला आहे. तालुक्यात तळ ठोकून दूधसंस्था व ठरावनिहाय मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. त्यामुळे पारंपारिक संचालक असलेल्या उमेदवारांनाही एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न यातून सुरु झाला आहे. शेवटी मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.

संघावरील १६ पैकी ५ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. गोपाळराव म्हस्के (हवेली), भगवान पासलकर (वेल्हे), राहुल दिवेकर (दौंड) आणि अनुसूचित जाती-जमाती गटामधून चंद्रकांत भिंगारे हे चार राष्ट्रवादीचे संचालक असून, पुरंदरमधून बिनविरोध निवडून आलेले मारुती जगताप हे काँग्रेस पक्षाचे आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलमधील उमेदवाराचा पराभव करुन भाजपचे प्रदीप कंद हे विजयी झाल्याने हा पराभव राष्ट्रवादीला जिव्हारी लागला होता. त्याची पुनरावृत्ती विशेषतः राखीव मतदार संघात होऊ नये, यावर पक्षनेतृत्वाने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे समजते. राखीव मतदार संघाचा विजय हा बहुतांशी अधिक मतदार असलेल्या शिरुर (168), जुन्नर (109), खेड (106), दौंड (80) आणि भोर (70 मतदान) या तालुक्यातील 500 हून अधिक मतदारांवर अवलंबून आहे. त्यादृष्टीने काँग्रेस पक्षाची साथ कशी मिळते, त्यावरही सहकार पॅनेलमधील राखीव मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

कात्रज दूध संघ अशा रंगणार लढती

आंबेगाव : राष्ट्रवादीचे विष्णू हिंगे विरुध्द शिवसेनेचे अरुण गिरे.

भोर : काँग्रेसचे अशोक थोपटे विरुध्द दीपक भेलके, दिलीप थोपटे (दोघेही अपक्ष)

खेड : राष्ट्रवादीचे अरुण चांभारे विरुध्द चंद्रशेखर शेटे.

जुन्नर : राष्ट्रवादीचे बाळासाहेब खिलारी, देवेंद्र खिलारी.

मावळ : राष्ट्रवादीचे बाळासाहेब नेवाळे, लक्ष्मण ठाकर, सुनंदा कचरे.

मुळशी : राष्ट्रवादीचे कालिदास गोपाळघरे, रामचंद्र ठोंबरे.

शिरूर : राष्ट्रवादीचे स्वप्निल ढमढेरे, योगेश देशमुख.

महिला प्रतिनिधी (2 जागा) :  संध्या फापाळे-जुन्नर, केशरबाई पवार-शिरूर, रोहिणी थोरात-दौंड, लता गोपाळे-खेड

इतर मागास प्रवर्ग (1 जागा) : वरूण भुजबळ- जुन्नर, भाऊ देवाडे- जुन्नर, अरुण गिरे-आंबेगाव.

भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ (1 जागा) :

प्रदीप पिंगट – बेल्हे :  जुन्नर, निखिल तांबे – रांजणगांव सांडस-शिरुर

Back to top button