स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक लवकरच नाशिकला | पुढारी

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक लवकरच नाशिकला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील पहिल्या पाच ’स्वच्छ’ शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक लागावा याकरिता नाशिक मनपाकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. त्या अनुषंगाने मनपाने केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक पुढील आठवड्यात नाशिक दौर्‍यावर येत आहे.

गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची घसरण झाली. त्यामुळे आता नागरिकांचा प्रतिसाद तसेच प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा पुनर्वापर आणि टाकाऊ बांधकाम साहित्याची विल्हेवाट या प्रमुख मुद्द्यांकडे महापालिकेला विशेष लक्ष पुरवावे लागणार आहे. यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विविध उपक्रम हाती घेत उपाययोजना सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जानेवारी महिन्यात स्वच्छ शहर स्पर्धेचे आयोजन केले जाते. केंद्रीय पथकांमार्फत सहभागी शहरांचे सर्वेक्षण करून देशभरातील स्वच्छ शहरांची यादी केंद्र शासनाकडून मार्च महिन्यात जाहीर केली जाते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2019 मध्ये 10 लाख लोकसंख्या असलेल्या देशभरातील 500 शहरांमध्ये नाशिक शहराचा 67 वा क्रमांक लागला होता. नाशिकची स्वच्छता सर्वेक्षणातील असमाधानकारक कामगिरी सुधरविण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. 2020 मध्ये नाशिकने 67 व्या क्रमांकावरून थेट 11 व्या क्रमांकावर झेप घेतली. मात्र, 2021 मध्ये मनपाची क्रमवारी घसरली. स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक 17 व्या क्रमांकावर घसरले. आता 2022 करिता घेण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये यावे, यासाठी मनपाच्या सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत.

घनकचरा व्यवस्थापनचे आवाहन
प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने मलजल निस्सारण प्रकल्प अद्ययावत करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे सादर केला आहे. टाकाऊ बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित मक्तेदाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने नागरिकांनी प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button