

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झाल्यानंतर घर आणि शेती हाच प्रपंच होता. बालपण कठीण काळात व्यतित झाल्यानंतर लग्नानंतरही संघर्ष होताच. अडचणीवर मात करून पुढे जायचं, हा तेव्हाच निश्चय केला होता. शेतीची आवड असल्याने, गावरान वाण जपण्याचा विचार पुढे आला. पुढे बीज बँकेचा विस्तार केला. मात्र ही बँक समाजासाठी उपलब्ध करून दिली जावी, या जाणिवेतून कार्य करण्यास सुरुवात केली, त्यातूनच सीड मदर बनले, असे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
रावसाहेब थोरात सभागृह येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वूमन डॉक्टर्स विंगतर्फे आयोजित केलेल्या 'तुझ्यातली तू' या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सोना टोपे उपस्थित होते. यावेळी राहीबाई पोपेरे यांनी आपला प्रवास विशद केला. आतापर्यंत 54 पिकांच्या 116 वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. परिस्थिती बेताची असल्याने अपुर्या जागेत ही बीज बँक उभारल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हा अत्यंत खडतर प्रवास होता. यामध्ये सुरुवातीला कुटुंबातून फारशी मदत झाली नाही. त्यानंतर मात्र जेव्हा मी करत असलेल्या कामाची जाणीव झाली, तेव्हा कुटुंबानेही आपल्या कामाचे महत्त्व जाणल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, याप्रसंगी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन अधिक कदम, एकच धर्म, मानव धर्म या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा आहेर, उर्मिला आगरकर यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा उलगडा करण्यात आला. डॉ. शीतल मोगल यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी डॉ. विभावरी, डॉ. रेखा सोनवणे यांनी आपल्या मधुर आवाजात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर अरुषी हिने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची व्यक्तिरेखा साकारत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमात काश्मीरमधील यशस्वी मुलींचा सत्कार करण्यात आला. डॉ. शलाका बागूल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयएमए वूमन विंगच्या अध्यक्षा डॉ. अनिता भामरे, चेतना दहिवलकर, डॉ. कविता गाडेकर, डॉ. राजश्री पाटील, डॉ. विशाल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.