नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सत्ताधारी भाजपच्या शेवटच्या महासभकडे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी पाठ फिरविल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयीच शंका उपस्थित होत आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 10) महासभा पार पडली. आयुक्त आणि सत्ताधारी भाजप असा संघर्ष आयटी परिषदेच्या वेळीही दिसून आला होता. महासभेस प्रशासनाचा प्रतिनिधी उपस्थित राहात नाही, तोपर्यंत सभेचे कामकाज न करण्याचा पवित्रा महापौरांनी घेतल्याने अखेर अर्ध्या तासाने प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे सभागृहात हजर झाले.
कोरोनामुळे दोन वर्षे महासभांचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.
किमान शेवटची महासभा ऑफलाइन व्हावी, अशी अपेक्षा महापौरांना होती. त्या दृष्टीने महापौर कुलकर्णी यांनी नगर सचिवांमार्फत आयुक्त जाधव यांना पत्र सादर केले. परंतु, कोरोना निर्बंध कायम असल्याचे कारण देत आयुक्तांनी ऑफलाइन महासभा तसेच स्नेहभोजनाची महापौरांची मागणी फेटाळून लावली. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे महापौर व्यथित झाले. ऑनलाइन पद्धतीने गुरुवारी (दि. 10) स्थायी समितीच्या सभागृहात महासभेचे कामकाज सुरू झाले. मात्र, प्रशासनाचा एकही प्रतिनिधी सभागृहात हजर नव्हता. त्यामुळे महापौरांनी आयुक्त कैलास जाधव किंवा त्यांचा प्रतिनिधी सभागृहात प्रत्यक्ष हजर होत नाही, तोपर्यंत कामकाज न चालविण्याची भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजपचे माजी गटनेते जगदीश पाटील, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनीही महापौरांच्या भूमिकेचे समर्थन करीत, ही बाब दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली.
महापौरांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करीत भाजप गटनेते अरुण पवार यांना पीठासनावर बसण्याची सूचना करीत सभागृह सोडले. तब्बल अर्धा तास नाराजीनाट्य सुरू असताना, अखेर नगर सचिव राजू कुटे यांनी प्रशासनाशी संवाद साधत प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली असता, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे सभागृहात हजर झाले.
वादग्रस्त इतिवृत्त तहकूबच :
शेवटच्या महासभेत दोन वर्षांपूर्वीच्या महासभांचे इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. इतिवृत्त मंजूर करण्याची सूचना नगर सचिवांनी केली असता, शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्यावर आक्षेप नोंदवित दोन वर्षांपूर्वी झालेल्या महासभेचे इतिवृत्त या महासभेवर कसे, असा प्रश्न बडगुजर यांनी केला. त्यावर 'प्रिंटिंग मिस्टेक' झाल्याचा दावा करीत नगर सचिव राजू कुटे यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, सदस्यांचा विरोध पाहता महापौर कुलकर्णी यांनी वादग्रस्त इतिवृत्त तहकूब ठेवले.