पुणे : जुन्या वादातून धारदार शस्‍त्राने एकाचा खून; जुन्नर तालुक्‍यातील कावळ पिंपरीतील घटना | पुढारी

पुणे : जुन्या वादातून धारदार शस्‍त्राने एकाचा खून; जुन्नर तालुक्‍यातील कावळ पिंपरीतील घटना

नारायणगाव ; पुढारी वृत्तसेवा जुन्या भावकीच्या वादाचा राग मनात धरून पाबळे गटातील एका समुहाने रोहिदास बाबुराव पाबळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना नारायणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कावळ पिंपरी (ता. जुन्नर) या ठिकाणी आज (बुधवार) ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कावळ पिंपरी याठिकाणी रोहिदास पाबळे व अंकुर पाबळे यांचा भाऊबंदकीमध्ये जुना वाद होता. त्या माध्यमातून रोहिदास पाबळे यांनी अंकुर पाबळे यांच्या वडिलांना पूर्वी मारहाण केली होती. या प्रकाराबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनला २०२० रोजी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी रोहिदास पाबळे यांनी पळ काढला होता, तर त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. रोहिदास पाबळे हा अटकपूर्व जामीन मिळवून बाहेर होता.

अंकुर पाबळे हा सध्या कावळ पिंपरी येथील बँक दरोडा प्रकरणात येरवडा कारागृहात आहे; मात्र जुन्या वादाचा राग मनात धरून अंकुर पाबळे गटातील एका समुहाने बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रोहिदास पाबळे यांना गाठुन धारदार शस्त्रांनी वार करून त्यांचा खून केला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही; मात्र विश्वसनीय सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) मनोज लोहिया व पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी भेट दिली आहे.

Back to top button