हातकणंगले, करवीरसह पन्हाळ्यात गव्यांचे दर्शन | पुढारी

हातकणंगले, करवीरसह पन्हाळ्यात गव्यांचे दर्शन

कासारवाडी / कोपार्डे / पोर्ले तर्फे ठाणे : बुधवारी सकाळी नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील डोंगर परिसरात आठ गव्यांचा कळप निदर्शनास आला. हे गवे जाखले, केखलेच्या दिशेने गेले असावेत, असा अंदाज वन विभागाच्या वतीने व्यक्‍त करण्यात आला.

गव्यांनी दिवसभर नवे पारगावच्या महादेव मंदिर डोंगर परिसरात वास्तव्य केले. गुरुवारी दिवसभर वनमजूर पुंडलिक खाडे यांनी या परिसरात गव्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना जाखले येथील नाईक मळा, रामोशी घोळ शेत परिसरातील मक्याचे पीक खात हा कळप पुढे जंगलाच्या दिशेने निघून गेल्याच्या खुणा आढळून आल्या .

पोर्ले तर्फ ठाणे परिसरातील शेतकरी धास्तावले

पोर्ले तर्फे ठाणे : पोर्ले तर्फ ठाणे (ता पन्हाळा) येथे पुन्हा गव्याचे दर्शन झाले असून त्यांनी शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. पोर्ले तर्फ ठाणे गावाच्या उत्तरेकडील डोंगरमाथ्यावर परशराम मंदिर परिसरात गेल्या आठवड्यातही पिकांचे मोठे नुकसान केले होते. तेच गवे चार दिवसांपूर्वी उत्रे गाव परिसरात दिसले होते. तर तीन-चार गव्यांनी खवरे व उत्रेकर पाणंद परिसरात गुरुवारी सकाळपासून पिकांची मोठी हानी केली. काही शेतकर्‍यांनी गव्यांना डोंगर माथ्यावर हुसकावून लावले.

आडूर येथे उसासह मका, काकडीचे नुकसान

कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथील धनगर खडीवरील शेतात गुरुवारी सकाळी गव्यांचे दर्शन झाले. वाघजाई डोंगराचे पूर्व बाजूस सातार्डे व आडूर या दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेल्या धनगर खडी येथील शेतातून वाघजाई डोंगराकडे जाणारे चार गवे शेतकरी व ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काहींनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला असता ते वाघजाई डोंगराच्या बाजूने पश्‍चिमेला निघून गेले. सध्या रात्रपाळी पाणी उपसा सुरू असल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्रीचे शेतावर जावे लागत आहे. यासाठी दिवसा दहा तास विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button