

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गुणवाढीच्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर शाखेच्या पथकाने नांदगाव तालुक्यातून निलंबित शिक्षकाला मालेगावच्या भायगाव शिवारातून अटक केल्याचे वृत्त आहे. त्यास 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याचे सूत्रांकडून समजले. या विषयी स्थानिक पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी या घोटाळ्याचे कनेक्शन नाशिकपाठोपाठ मालेगावपर्यंत पोहोचले आहे.
2019-20 मध्ये ही परीक्षा झाली होती. प्राथमिक तपासात जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रीतिश देशमुख याने तब्बल सात हजार 880 अपात्र परीक्षार्थींना एक ते दोन लाख रुपये घेऊन पात्र केल्याचा आरोप आहे. यासाठी जिल्हास्तरावर एजंटांचे जाळे वापरण्यात आल्याचे तपासात उघड होते. सायबर विभागाने 20 फेब्रुवारीला बुलढाणा येथून दीपक भुयारी, तर नांदगाव (जि. नाशिक) तालुक्यातील बोराळे येथून राजेंद्र विनायक सोळुंके (52) याला अटक केली होती. त्यांच्या उलटतपासणीतून मुकुंद जगन्नाथ सूर्यवंशी (33) याचे नाव पुढे आले. सूर्यवंशी जिल्हा परिषदेच्या बोराळे शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर 18 फेब्रुवारीला निलंबनाची कार्यवाही होऊन मालेगाव तालुक्यात पदस्थापना होऊन तेथे हजर होण्याची नोटीस निघाली होती.
मात्र, सूर्यवंशी हजरच झाले नसल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी धोंगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली. दरम्यान, सूर्यवंशी यांच्यासह इतरही काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा आहे. सूर्यवंशी यांना 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याचे सांगण्यात येते. आता या एजंटांच्या माध्यमातून किती जण गैरमार्गाने परीक्षा उत्तीर्ण झाले, याचादेखील शोध घेतला जाणार आहे.