नंदुरबार : तलाठ्यास मारहाण करीत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पळविले | पुढारी

नंदुरबार : तलाठ्यास मारहाण करीत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पळविले

नंदुरबार (शहादा) पुढारी वृत्तसेवा : अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई केल्याच्या रागातून तलाठ्यास मारहाण करीत ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी तीन संशयिताविरोधात शहादा पोलिसात काल रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.

काल (दि. ८) रोजी सकाळी १०. १५ वाजेच्या सुमारास शहादा येथील महालक्ष्मीनगर येथील बाला उर्फ कपिल प्रकाश माळीच, बाला याच्यासोबत असलेला इसम व तिखोरा येथील उत्तम नारायण भिल हे तिघेजण त्यांच्या ताब्यातील विना नंबरच्या ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करत होते. यामुळे तलाठी पंकज सुधाकर पवार यांनी सदरचे ट्रॅक्टर अडवून कारवाईसाठी ताब्यात घेतले. हे ट्रॅक्टर चालवून नेत असताना शहादा प्रकाशा रस्त्यावरील मनीष पेट्रोल पंपाजवळ तिघांनी पंकज सुधाकर पवार यांना रस्त्यात अडविले. यावेळी तलाठी पंकज सुधाकर पवार यांनी सदरचे ट्रॅक्टर मधून अवैधरित्या गौण खनिज वाहतूक होत असल्याने सदर वाहन तहसील कार्यालयात जमा करावे लागणार असल्याची समज दिली.  मात्र तिघांनी ऐकून न घेता तलाठी पंकज सुधाकर पवार यांना पाठीवर पोटावर आता हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.  तसेच अर्वाच्य शिवीगाळ करून दमदाटी केली.

ट्रॅक्टर चालक उत्तम नारायण भिल याने सदरचे वाहन घेऊन निघून गेला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तलाठी पंकज सुधाकर पवार यांच्या फिर्यादीवरून संशयित बाला उर्फ कपिल प्रकाश माळीच व बाला याच्यासोबत इसम अशा तिघा विरोधात शहादा पोलीस ठाण्यात काल रात्री उशिराने भादवी ३५३, ३३२, २९४, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी काल रात्री भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आरक करीत आहेत. तसेच दोन संशयित फरार आहेत.

हेही वाचा :

Back to top button