Gold silver prices today : ऐन लग्नसराईत सोन्याने घाम फोडला! जाणून घ्या प्रति तोळा दर | पुढारी

Gold silver prices today : ऐन लग्नसराईत सोन्याने घाम फोडला! जाणून घ्या प्रति तोळा दर

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold, silver prices today : रशिया आणि युक्रेन संघर्षामुळे जागतिक बाजारात सोन्याचे (Gold Rate Today) दर उच्चांकी पातळीवर पोहोचले. भारतीय बाजारांतही सोने महागले आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतली आहे. एमसीएक्सवर मंगळवारी (दि.८) एप्रिल डिलिव्हरी सोन्याचा भाव प्रति तोळा ५४ हजार रुपयांवर पोहोचला. सोन्यासह चांदीही महागली आहे. मे डिलिव्हरी चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार रुपयांवर पोहोचला आहे. काल सोमवारी (दि. ७) सोन्याचा दर ५२,५५९ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. तर चांदी ६९,१६० रुपयांवर होती. आज सोन्यासह चांदी वधारल्याचे दिसून आले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात (Gold silver prices today) सोन्याचा दर प्रति औंस २ हजार डॉलरवर गेला आहे. तर चांदी प्रति औंस २५.४७ डॉलरवर आहे.

रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आदी कारणांमुळे सोन्याला जबरदस्त मागणी आली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, मंगळवारी १० ग्रॅम शुद्ध सोन्याचा दर ५३,४१० रुपयांवर खुला झाला होता. तर २३ कॅरेट सोने ५३,१९६, २२ कॅरेट सोने ४८,९२४ रुपये होता. चांदी प्रति किलो ७०,३४९ हजारांवर आहे.

जगात जेव्हा तणावाची परिस्थिती अथवा संकटे निर्माण होतात त्यावेळी त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन मालमत्ता) म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे सोने तेजीत येते. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोने एका वर्षातील उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भाजप नेत्या पंकजा मुंडे राजकारणात कशा आल्या? – सांगत आहेत, त्या स्वतःच

Back to top button