मालेगाव : सेना, भाजपचा विरोध डावलून ईदगाहला जागा देण्याचा ठराव, महापौरांनी रेटला विषय | पुढारी

मालेगाव : सेना, भाजपचा विरोध डावलून ईदगाहला जागा देण्याचा ठराव, महापौरांनी रेटला विषय

 मालेगाव (जि. नाशिक) :  पुढारी वृत्तसेवा ; ऑनलाइन अभूतपूर्व गोंधळात मित्रपक्ष शिवसेना आणि भाजपचा तीव्र विरोध डावलून अखेर महापौर ताहेरा शेख यांनी कॉलेज ग्राउंड संदर्भातील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेशी झालेला करार रद्द करून संपूर्ण जागा शहर ईदगाह ट्रस्टच्या नावावर करण्याचा ठराव मंजूर केला. उपमहापौरांनी सभागृहातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली तर, भाजपच्या गटाने ईदगाह मैदानावर ठाण मांडून या विषयाला कडाडून विरोध केला. परंतु, तो दुर्लक्षित ठरला.

मालेगाव महानगरपालिकेची मासिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 7) दुपारी 4 वाजता ऑनलाइन पद्धतीने झाली. त्यात वादग्रस्त ईदगाह मैदानाच्या जागेवरून प्रचंड गदारोळ झाला. भाजप गटाने ‘त्या’ जागेवरूनच सभेत सहभाग नोंदवत सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले. प्रथम जागा कुणाच्या मालकीची आहे हे स्पष्ट करावे, शासनाच्या जागेवर मनपा कसा हक्क सांगणार, असा जाब विचारण्यात आला. गटनेते सुनील गायकवाड, नगरसेवक गजू देवरे, मदन गायकवाड, दीपाली वारुळे, संजय काळे, तुळसाबाई साबणे आदींनी हा विषय फाइल करा, क्रीडांगण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या. विद्यार्थी, खेळाडू आणि आरोग्यप्रेमी नागरिकांच्या जागेवर राजकारण टाळा, असा आग्रह गायकवाड यांनी धरला.

तर, महागठबंधन आघाडीच्या गटनेत्या शान ए हिंद व एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी या विषयावरून शहरवासीयांची दिशाभूल करणे बंद करा, असे ठणकावले. यावेळी सर्वच सदस्य भूमिका मांडू लागल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे निर्णयही कळू शकला नाही. त्याबाबत सभेनंतर महापौर शेख यांनी स्पष्टीकरण देत, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेशी साधारण 60 वर्षांपूर्वी झालेला करार रद्द करून संपूर्ण जागा नाममात्र भाडेकरारावर शहर ईदगाह ट्रस्टच्या नावे करावी, असा ठराव करून तो शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत बांधण्यात आलेल्या एफएसटीपीला संरक्षण भिंत व वॉचमन खोली बांधण्यासाठी 24 लाख 99 हजार 240 व रस्ता बांधणीसाठी 13 लाख 85 हजार 904 रुपयांच्या निधी खर्चाला मान्यता देण्यात आली. मनपा मुख्यालयात अत्याधुनिक स्वयंचलित अग्निशमन यंत्र बसविण्याचा निर्णय झाला. गिरणा पंपिंग स्टेशनवरील बंद असलेल्या चार पंपांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यासह इतर विषयांनाही मान्यता देण्यात आली.

शिवसेनेची भूमिका
शहरातील एकमेव मोठ्या पोलिस कवायत मैदानावरील ‘त्या’ जागेबाबत झालेला करार रद्द करावा. मात्र, संपूर्ण जागा ईदगाह ट्रस्टला देण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे उपमहापौर नीलेश आहेर यांनी सांगितले. वर्षातून दोनदा सामुदायिक नमाजपठण होते, उर्वरित वर्षभर क्रीडांगण सर्वधर्मीयांसाठी खुले असते. त्यात कुणालाही आतापर्यंत अडचण आलेली नाही. त्यामुळेच तेथे सव्वा कोटी खर्चून जॉगिंग ट्रॅक बांधला जात आहे. त्यात कुणी राजकारण करून नये, ही जागा जिल्हाधिकार्‍यांच्या नावे झाल्यास भविष्यात राजकारण होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

Back to top button