सातारा पुढारी वृत्तसेवा: सातार्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने बुलेटची ट्रायल घेतो असे सांगून बुलेट घेवून गेला. मात्र, बराचवेळ झाला तरी संबंधित व्यक्ती न आल्याने त्याने बुलेट चोरी केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने खळबळ उडाली असून तक्रारदाराने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, तक्रारदार आरीफ शेख यांचा शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी बुलेट विकायची असल्याचे त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली.
त्यासंबंधी एकाने पुण्यातून बोलत असल्याचे सांगून व व्हॉट्सअॅपवर चॅट करून बुलेटची माहिती घेतली. किमतीबाबत विचारणा झाल्यानंतर फायनल किंमत शेख यांनी सांगितली. त्यानुसार सोमवारी संबंधित व्यक्ती पुण्यातून आली.
आरीफ शेख यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर बुलेटची ट्रायल घेतो, असे सांगून त्यांनी बुलेटला किक मारली. बुलेट ट्रायलसाठी घेवून गेल्यानंतर अर्धा तास होवून गेल्यानंतरही संबंधित व्यक्ती न आल्याने शेख यांनी शोधाशोध केली.
बुलेट व संबंधित व्यक्ती येत नसल्याने व ते सापडत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.