नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या एक मूठ पोषण योजनेमुळे जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पोषण आहार जनआंदोलन कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे स्थायी समिती सभेमध्ये अध्यक्षांच्या हस्ते सभापती अश्विनी आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी मागील पाच वर्षांचे लेखे पूर्ण करणारे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेची मुदत 20 मार्चला संपणार आहे. त्यामुळे स्थायी समितीची अखेरची सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती संजय बनकर, अश्विनी आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, सविता पवार व छाया गोतरणे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. मागील महिन्यातील तहकूब सभा घेतल्यानंतर कोरमअभावी अर्धा तास सभा थांबवून घेण्यात आली होती. त्यावेळी विषयपत्रिकेत काहीही विषय नसल्याने विषय समित्यांच्या सभांचा आढावा घेण्यात आला.
महिला व बालविकास विभागाच्या पोषण आहार जनआंदोलन कार्यक्रमाची राज्यस्तरावर दखल घेऊन तृतीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. त्याबद्दल त्यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महिला व बालविकास सभापती अश्विनी आहेर व जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी सभापती संजय बनकर यांनी सभापती व प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक करीत अभिनंदन केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उद्या (दि.8) रोजी सन्मान सोहळा होणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक व अंगणवाडी कर्मचारी यांनी कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न केले. यात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे या पुरस्काराचे खरे श्रेय त्यांचे आहे.
– अश्विनी आहेर, सभापती, महिला व बालविकास समितीमहिला व बालविकास विभागाने पोषण आहार योजना चांगल्या पद्धतीने राबविल्यामुळे आपल्या जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला, ही कौतुकाची बाब आहे. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी, सभापती व जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन करतो.
– बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद नाशिक