साेलापूर : कृषी पंप वीज बिलासाठीच्या बैठकीत तोडगा नाहीच | पुढारी

साेलापूर : कृषी पंप वीज बिलासाठीच्या बैठकीत तोडगा नाहीच

मंगळवेढा : पुढारी वृतसेवा
वीज वितरण कंपनीने कृषी पंपाच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी मागील दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकरीवर्ग आक्रमक झाला आहे. या वीज तोडणीबाबत चर्चा करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील वीज वितरणच्या 33 के.व्ही. उपकेंद्रात वीज वितरणचे अधिकारी व शेतकरी यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली.

दरम्यान, यामध्ये प्रत्येक शेतकर्‍यांनी 10 हजार रुपये भरावेत, असे अधिकार्‍यांचे म्हणणे होते, तर शेतकरी 5 हजार रुपये भरण्यास तयार असतानाही केवळ वीज वितरणच्या अधिकार्‍यांच्या 10 हजार रुपयांच्या अट्टाहासापायी तोडगा न निघाल्याने अखेर शेतकरी शासन व वीज वितरण कंपनीविरुद्ध संताप व्यक्त करीत बैठकीतून उठून गेले.

ब्रह्मपुरी येथील वीज वितरणच्या 33 के.व्ही. उपकेंद्रामधून ब्रम्हपुरी व माचणूर परिसर येथील शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी वीजपुरवठा केला जातो. मागील दोन दिवसांपासून कृषी पंपाच्या बिल वसुलीसाठी कुठलेही प्रिंट बिल न देता केवळ तुमच्याकडे अमुक एवढी बाकी आहे, असे म्हणून वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा बंद केला होता. यावर चर्चा करण्यासाठी मंगळवेढा ग्रामीणचे शाखा अभियंता यांनी दुपारी 12 वाजता ब्रम्हपुरी येथील शेतकर्‍यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रिंट बिल द्यावे, मगच आमच्याकडे बिल मागावे, असा संतापजनक सवाल उपस्थित शेतकर्‍यांचा होता. प्रिंट बिल न देता कुठल्या कायद्यान्वये तुम्ही शेतकर्‍यांना बिल मागत आहात, असाही बैठकीत सूर शेतकर्‍यांचा होता. यापूर्वी शेतकर्‍यांनी वर्षभरात जवळपास तीनवेळा बिले भरली आहेत. या आर्थिक बिलाच्या शेतकर्‍यांना पावत्या दिल्या नसल्याच्या तक्रारी मांडल्या. पावत्या न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी लाईनमनकडे दिलेल्या पैशावर उपस्थित शेतकर्‍यांनी शंका व्यक्त केली. या अनागोंदी कारभाराबाबत बैठकीत शेतकर्‍यांनी आक्रोश केला.

अधिकार्‍यांनी चालू बिल भरल्यानंतरच वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे ठणकावून सांगितले. यावेळी जे शेतकरी 10 हजार रुपये भरतील, त्यांचा वीजपुरवठा सुरू केला जाईल, जे भरणार नाहीत त्यांचे कनेक्शन कट केले जाईल, असे अधिकार्‍यानी सांगताच शेतकर्‍यांनी 10 ऐवजी 5 हजार रुपये भरण्याचा सूर काढला. मात्र, या संमतीला अधिकार्‍यांनी दाद न दिल्याने अखेर शेतकर्‍यांना बैठकीतून रिकाम्या हाताने परतावे लागले. काही शेतकर्‍यांचे साखर कारखान्याला ऊस गेले आहेत. त्यांची बिले अद्याप आली नसल्यामुळे शेतकर्‍यांकडे आर्थिक टंचाई आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी दोन तास वीजपुरवठा

पूर्णतः वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मुक्या प्राण्यांसह माणसांच्या घशाला पाण्याअभावी कोरड पडत असल्याचा आक्रोश शेतकर्‍यांनी केला. यानंतर दोन तास पाणी पिण्यासाठी वीजपुरवठा सुरू केला जाईल, अशी ग्वाही वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना दिली. या बैठकीला जवळपास 200 शेतकरी उपस्थित होते.

Back to top button