

धुळे, पुढारी वृत्तसेवा : अपराध केलेल्या बालकाला त्याने केलेल्या अपकृत्यची जाणीव करून देत असतानाच या गुन्ह्याचा त्याच्या भविष्यावर कोणताही परिणाम होऊ नये, असा निकाल धुळ्याच्या बाल न्याय मंडळाने दिला आहे. शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला दुचाकीची धडक देऊन हुज्जत घालणाऱ्या बालकाला या गुन्ह्यांमध्ये सहा महिन्यांपर्यंत दररोज वाहतुकीचे नियमन करण्यासाठी मदत करण्याची म्हणजेच सामाजिक सेवा करण्याची शिक्षा न्याय मंडळाने दिली आहे.
या गुन्ह्यातील कागदपत्र नष्ट करून या बालकांच्या भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे देखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे. धुळे येथील कमलाबाई कन्या शाळेजवळ 10 डिसेंबर 2017 रोजी सकाळी अकरा वाजेला हा गुन्हा घडला होता. धुळे शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या मोनाली शरद सैंदाणे या महिला कॉन्स्टेबल तसेच पोलीस नाईक उमेश दिनकर सूर्यवंशी हे कमलाबाई शाळेच्या चौकात वाहन नियमनाची ड्युटी करत होते.
यावेळी एका दुचाकीवरून विधी संघर्ष बालक डबल सीट भरधाव वेगाने या चौकातून जात असताना त्याला शहर वाहतूक शाखेच्या या दोनही कर्मचाऱ्यांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला .मात्र विधी संघर्षने दुचाकी न थांबता मोनाली सैंदाणे यांना धडक दिली. त्यामुळे सैंदाणे या रस्त्यावर पडल्याने त्यांना जखमा झाल्या. यानंतर या बालकांनी पोलीस नाईक सूर्यवंशी यांच्याबरोबर अरेरावी करत हुज्जत घातली तसेच शिवीगाळ केली.
यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 353 ,279, 337 व मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांनी या संदर्भातला तपास अहवाल बाल न्याय मंडळासमोर सादर केला. या प्रकरणात बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती एस. एन. गंगवाल , सदस्य यशवंत हरणे व अनिता भांबेरे यांच्या समोर तपास अधिकारी दिलीप गांगुर्डे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश झाडबुके यांच्यासह महत्त्वाचे आठ साक्षीदार तपासले.
विधी संघर्ष बालकाच्या वतीने विधिज्ञांनी बचावासाठी युक्तिवाद करताना विधी संघर्ष बालक हा बीएचे शिक्षण घेत असून तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अर्धवेळ नोकरी करत असल्याची बाब मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. बालकावर यापूर्वी अन्य कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच हा गुन्हा घडल्यानंतरही कोणतेही गुन्हा त्याच्यावर दाखल नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. अशा परिस्थितीत त्याला विशेष गृहात ठेवण्याची शिक्षा देणे योग्य ठरणार नाही.
त्यामुळे त्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी किंवा समज देऊन सोडण्यात यावे ,अशी विनंती बचाव पक्षाच्या विधिज्ञांनी केली तर सरकारी अभियोक्ता वकील रसिका निकुंभ यांनी बालकाविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला आहे. समाजात अशा गुन्ह्यांना शिक्षा होते, असा संदेश जाणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद केला. युक्तिवाद आणि पुरावा पाहता बाल न्याय मंडळाने या बालकास दोषी धरले आहे. या बालकांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता व तो सध्या करीत असलेल्या शिक्षण व नोकरी पाहता तसेच त्याच्या विरुद्धचे सिद्ध झालेले आरोप पाहता ,त्याने यापुढे अशा प्रकारचा गुन्हा करू नये, याबरोबरच त्याचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने अन्य कुठल्याही शिक्षेऐवजी त्याला समज देऊन त्याला वाहतूक नियमाचे काम दररोज तीन तास असे सहा महिन्यासाठी करायला लावण्याची शिक्षा योग्य ठरणार असल्याचे मत मंडळाने व्यक्त केले.
याबाबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी सहा महिन्यांपर्यंत दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मंडळाला अहवाल सादर करावा असेही आदेश केले आहेत. बाल न्याय मुलांची काळजी व सुरक्षा कायदा 2015 च्या कलम 24 (1) अन्वये बालकास त्याचे पारपत्र शिक्षण किंवा इतर कुठल्याही कारणाकरता या शिक्षेमुळे अपात्र ठरविण्यात येऊ नये, त्याचप्रमाणे या कायद्याच्या कलम चोवीस (दोन) अन्वये संबंधित पोलीस ठाणे यांनी अपील कालावधीनंतर बालकाचे गुन्ह्या संबंधीचे सर्व दस्त नष्ट करण्याचे आदेश देखील मंडळाने दिले आहेत.