धुळे : 19 लाखांच्या गुटख्यासह 20 लाखांची दोन वाहने जप्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई | पुढारी

धुळे : 19 लाखांच्या गुटख्यासह 20 लाखांची दोन वाहने जप्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा :  आंतरराज्य गुटखा तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पोलिसांनी मंगळवारी (ता.1) रात्री नऊच्या सुमारास सामोडे चौफुलीवर केलेल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले. येथील पोलिसांनी आंतरराज्य गुटख्याची तस्करी उधळून लावताना 20 लाखांच्या दोन वाहनांसह तब्बल 19 लाख 40 हजारांचा विमल गुटखा, तसेच व्ही-1 तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. पोलिसांनी या प्रकरणी चालकासह एका संशयिताला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पोलिसांनी संशयित इनोव्हा कारचा फिल्मी स्टाइल पाठलाग करत ती अडविली. मात्र, त्यातील चार जण मात्र फरार होण्यात यशस्वी ठरले.

गुप्त माहितीवरून रचला सापळा

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी अवैध व्यवसायांसह आंतरराज्य गुटखा तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने पिंपळनेर येथील पोलिस ठाण्यातर्फे नियमित पेट्रोलिंग व नाकाबंदीही करण्यात येत आहे. येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांना एक मार्चला पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार श्री साळुंखे, पोलिस नाईक विशाल मोहने, शिपाई मकरंद पाटील, चालक पोलिस शिपाई रवींद्र सूर्यवंशी आदींनी मंगळवारी सायंकाळपासून सामोडे चौफुलीवर सापळा लावला. रात्री नऊच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पिक-अप वाहन (एमएच46/बीबी 0173) येताना दिसले. पथकाने ते अडवून चालक नासीर खान हयात खान (वय 42, रा.मिल्लतनगर, 40 गाव रोड, धुळे) याच्याकडे मालाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने वाहनात विमल गुटखा असल्याचे सांगून हा माल धुळे येथील विठ्ठल साबळे व अमोर मोरे यांच्या सांगण्यावरून आपल्यासह झुबेर अन्सारी वसीम अन्सारी, सोनू विधाते (तिघे रा. नटराज टॉकीजजवळ, धुळे) तसेच सचिन जीवन मुर्तडकर (रा. गल्ली क्रमांक पाच, धुळे) व प्रियकीर्ती राजू पगारे (रा. गायकवाड चौक, धुळे) यांच्यासह गुजरातमधून विकत घेत धुळ्याला नेत असल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे तर सर्व पाचही संशयित सोबत मागे-पुढे इनोव्हा कारने (एमएच06/बीई7695) येत असून, पोलिसांच्या वाहनावर पाळत ठेवून असल्याचेही सांगितले.

अन् फिल्मी स्टाइल पाठलाग
चालक नासीर खानकडे ही चौकशी सुरू असतानाच पोलिसांना संबंधित इनोव्हा कार येताना दिसली. ती थांबविण्याचा इशारा केला असता संशयित वेगाने पळून गेले. पोलिसांनी या कारचा पाठलाग करत ती अडविली. मात्र, या इनोव्हामधील झुबेर अन्सारी, वसीम अन्सारी, सोनू विधाते व सचिन मुर्तडकर हे पळून जाण्यात यशस्वी ठरले, तर प्रियकीर्ती पगारे हा मात्र पोलिसांच्या हाती लागला.

पाच संशयितांविरुद्ध गुन्हा
पोलिसांनी पिक-अप वाहनाची तपासणी केली असता त्यात 16 लाख 76 हजार 160 रुपयांची विमल गुटख्याची पाकिटे, तसेच दोन लाख 64 हजार 540 रुपयांची व्ही-1 तंबाखू असा एकूण 19 लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलिसांनी आठ लाखांचे पिक-अप वाहन तसेच 12 लाखांची इनोव्हा कार अशी एकूण 20 लाखांची दोन वाहने असा एकूण 39 लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस शिपाई मकरंद पाटील यांच्या फिर्यादीनुसार पिंपळनेर येथील पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे तपास करत आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, भाईदास मालचे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण अमृतकर, पोलिस नाईक विशाल मोहने, चेतन सोनवणे, पोलिस शिपाई सोमनाथ पाटील, मकरंद पाटील, रवींद्र सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button