

गांधीनगर : विश्वास शिंदे
गांधीनगर बाजारपेठेला खंडणीखोरांचे पेव फुटले असून बांधकामधारक आणि छोटे-मोठे व्यापारी यांना त्यांनी टार्गेट केले आहे. एकूणच संपूर्ण बाजारपेठ खंडणीखोरांच्या विळख्यात सापडली आहे. काही खंडणीखोरांना चोप देऊन चक्रव्यूह भेदण्याचा काहींनी प्रयत्न केला आहे; मात्र ही कीड संपवण्यासाठी सर्व घटकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
गांधीनगर बाजारपेठेला खंडणीखोर नवीन नाहीत. पूर्वी खंडणीसाठी व्यापार्यांच्या मुलांचे अपहरण झाले होते. पोलिस प्रशासनाने व सजग नागरिकांनी शोध घेऊन त्यांना जेरबंद केले होते. अलीकडे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रकार बंद झाला आहे. खंडणीखोरांनी आपला मोर्चा बेकायदेशीर बांधकामधारकांकडे वळविला आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून झूल पांघरायची, ग्रामपंचायतीसह संबंधित प्रशासनाकडे बगलबच्च्यांना पुढे करून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवायची आणि तक्रार करायची. प्रशासनालाही सोशल मीडियावरून त्रस्त करायचे. न्यायालयात दाद मागण्याची बांधकामधारकांना सोशल मीडिया अथवा पंटरकडून दटावणी द्यायची. संबंधित बांधकामधारक न्यायालय अथवा प्रशासनाचा ससेमिरा नको म्हणून या खंडणीखोरांना शरण येत, तुम्हीच मार्ग काढा, आमचे बांधकाम तुम्हीच करून द्या, अशी विनवणी करत बांधकामधारक हे तक्रारदार, खंडणीखोरांसमोर अक्षरश: लोळण घेऊ लागले.
नेमका याचाच फायदा घेत बांधकामधारकांकडून खंडणी वसूल होऊ लागली. खंडणी ठरवण्यासाठी मध्यस्थी करणारे काही नामचीन पुढे आले. खंडणी एकदा ठरली की, सुरक्षितरीत्या पोहोचवण्याची जबाबदारी मध्यस्थी करणारा घेत असे. प्रारंभी पाच लाख, दहा, 15, 25 लाख खंडणी वसूल करणारे आता पन्नास लाखांपासून कोटीपर्यंत पोहोचले आहेत. खंडणीच्या माध्यमातून 25-25, 30-30 लाखांचे अनेक दुकानगाळे खंडणीखोरांनी आपल्या घशात घातले आहेत.हा काळा मार्ग चोखाळताना त्यांनी प्रशासनातील कच्च्या दुव्यांचा आधार घेतल्याची चर्चा सर्वश्रुत आहे. कायद्याची भीती दाखवून बेकायदा वागणार्या अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी काहीजण पुढे येत आहेत; त्यांना सामाजिक बळ मिळणे गरजेचे आहे. हाक मिळताच पोलिस प्रशासनही सज्ज आहे.
बांधकामधारकांना अगर टपरीधारकांना कोणी त्रास देत असेल, तर संबंधितांनी गांधिनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा त्रास देणार्या अगर खंडणी मागणार्यांवर निश्चितपणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिस प्रशासन त्यासाठी कटिबद्ध आहे.
– साहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले