नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयित बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के याला सोमवारी (दि. 28) न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
डॉ. वाजे खून प्रकरणातील महत्त्वाची माहिती म्हस्के याने दिल्यामुळे पोलिसांच्या तपासाला गती व दिशा मिळाली होती. जानेवारी महिन्यात वाडिवर्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत जळालेल्या कारमध्ये महिलेचा सांगाडा आढळून आला होता. पोलिस तपासात हा सांगाडा डॉ. वाजे यांचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला डॉ. वाजे यांचे पती संदीप वाजे याला अटक केली. मात्र, त्याने पोलिसांना ठोस माहिती न दिल्याने पोलिसांचा तपास तांत्रिक मुद्यांवर होता.
त्यानंतर पोलिसांनी संशयावरून म्हस्केला अटक केली. त्याने पोलिस चौकशीत डॉ. वाजे यांचा मृतदेह व कार सॅनिटायझरने जाळल्याची कबुली दिल्याने या गुन्ह्यात पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला.
दरम्यान, म्हस्केच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.