नाशिक जिल्हा परिषदेत पोरखेळ ; सदस्यांचा आक्षेप, अंदाजपत्रकीय सभेत अध्यक्षांनी बदलवला निर्णय

जिल्हा परिषद नाशिक,www.pudhari.news
जिल्हा परिषद नाशिक,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या अखेरच्या अंदाजपत्रकीय सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी व सत्ताधारी सदस्यांच्या परस्परविरोधी भूमिकांचे दर्शन घडले. यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एका ठरावात सर्व 66 विषय मंजूर केले. एकंदरीत कार्यकाळ संपत असताना सभेत पोरखेळ सुरू असल्याची भावना यावेळी सदस्यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय सभा ऑनलाइन घेण्यास विरोध करणार्‍या सदस्यांनी सभा तहकूब करून बुधवारी (दि. 2) सभागृहात सभा घ्यावी, अशी भूमिका घेतली. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती डॉ. सयाजी गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी सदस्यांची समजूत काढत आजच्या ऑनलाइन सभेत अंदाजपत्रक मांडून घेऊ व आयत्यावेळच्या विषयांसाठी स्वतंत्र सभा बुधवारी (दि.2) सभागृहात सर्वसाधारण सभा घेऊ, अशी भूमिका मांडली. अध्यक्ष क्षीरसागर यांनीही आज केवळ अंदाजपत्रक मंजूर केले जाईल व उर्वरित विषयांसाठी सभागृहात स्वतंत्र सभा घेतली जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी सभेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

दरम्यानच्या काळात अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन सभा पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी नियमित पहिले बारा विषयांवर चर्चा घेऊन सभा तहकूब करावी, अशी भूमिका भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी मांडली. त्यानुसार सभेतील नियमित विषयांवर चर्चा झाली. या विषयांमध्ये पंधरावा वित्त आयोगाचे नियोजन व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आराखड्याबाबत चर्चा होऊन त्यांना मंजुरीही देण्यात आली. यानंतर सभा तहकूब करण्याची भूमिका घेण्याऐवजी अध्यक्षांनी मौनाची भूमिका घेतली. राष्ट्रवादीचे सदस्य यतिन पगार यांनी आजच आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा घ्यावी, अशी भूमिका घेतल्यानंतर अध्यक्षांना सभेचे सचिव आनंद पिंगळे यांना पुढील विषयांचे वाचन करण्याचे निर्देश दिले. यामुळे सभेचे कामकाज सुरू झाले. अध्यक्ष सकाळच्या सत्रात स्वत:च जाहीर केलेला निर्णय फिरवत आहेत, याची जाणीव डॉ. कुंभार्डे यांनी करून दिल्यानंतरही अध्यक्ष काहीही प्रतिसाद देत नाही हे बघून डॉ. कुंभार्डे यांनी अध्यक्षांच्या भूमिकेचा निषेध केला.

ऑनलाइन सभेविरोधात सर्वपक्षीय आक्रमक

सर्वसाधारण सभेला विरोध करीत सदस्यांचा गोंधळ

जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेला विरोध करीत सदस्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. सदस्यांची मागणी विचारात घेतली जात नसल्याचे बघून आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या मांडले होते.

प्रशासन व पदाधिकार्‍यांचा निषेध नोंदवायचा आहे, तर अध्यक्षांच्या दालनातच जमिनीवर बसून तीव— विरोध करू, अशी भूमिका या आंदोलनकर्त्या सदस्यांनी घेतली होती. अध्यक्षांच्या दालनाकडे धाव घेत या सदस्यांनी जमिनीवर बसून प्रशासनाचा निषेध केला. ही सभा तहकूब करून बुधवारी सभागृहात सभा घेण्याची भूमिका डॉ. कुंभार्डे यांनी घेतली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याशेजारी ठिय्या मांडलेले राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव, सदस्य यशवंत शिरसाठ, सिद्धार्थ वनारसे, यशवंत ढिकले, लता बच्छाव, सुरेश कमानकर, गीतांजली पवार-गोळे, ज्योती जाधव यांनीही रोष व्यक्त केला. ऑनलाइन सभा रद्द होत नाही, तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, असा पवित्रा भाजपचे गटनेते डॉ. कुंभार्डे यांनी घेतल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली. कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. डॉ. कुंभार्डे यांनी आपली भूमिका कायम ठेवत अध्यक्ष हे प्रशासनाच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोेप केला. अखेरीस सोमवारी (दि. 28) केवळ अंदाजपत्रक मंजूर करणे व बुधवारी आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्याचे अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर अर्थसभापती गायकवाड यांनी डॉ. कुंभार्डे यांनी सहभागी होण्याची विनंती केल्यानंतर डॉ. कुंभार्डे सहभागी झाले.

हेही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news