सिंधुदुर्ग : दोडामार्ग नगरपंचायत उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यावरून वादंग | पुढारी

सिंधुदुर्ग : दोडामार्ग नगरपंचायत उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यावरून वादंग

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) पुढारी वृत्तसेवा : कसई-दोडामार्ग (सिंधुदुर्ग) नगरपंचायतीच्या उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, यावरून सभागृहात जोरदार वादंग निर्माण झाला.  लोकांना केवळ शोबाजी करण्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जातो. महाराजांच्या नावाला या सभेत विरोध होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

यामुळे दोडामार्गातील (सिंधुदुर्ग) राजकारण हे महाराष्ट्रात खूप गलिच्छ आहे, अशी खंत राष्ट्रवादीचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर व शिवसेनेचे नगरसेवक रामराव गावकर यांनी व्यक्त केली. तर उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्यास त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ शकतो, असे मत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी व्यक्त केले. मैला प्रक्रिया केंद्राच्या विषयावरूनही सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी-शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली.

दोडामार्ग न.पं.निवडणुकीनंतर पहिलीच सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अनेक विषयांमुळे ही सभा वादळी ठरली. मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, उपनगराध्यक्ष देविदास गवस व नगरसेवक उपस्थित होते.

शहरातील मैला, गाळ यावर प्रक्रिया करण्यासाठी केळीचे टेंब येथे एक प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असल्याचा विषय मांडण्यात आला. यावेळी खरेदी केलेली सक्शन वाहिका धूळ खात पडली आहे. त्यामुळे लोकांच्या पैशाचा एकप्रकारे अपव्यय चालू असल्याचा आरोप रामचंद्र ठाकूर व रामराव गावकर यांनी केला.

मैला प्रक्रिया केंद्र होणे गरजेचे असल्याचे मत संतोष नानचे यांनी व्यक्त केले. त्यामुळे ज्या ठिकाणी हे केंद्र उभारले जाईल, त्याचा सर्व्हे करून मान्यता द्यावी. तसेच संबंधित जमीन मालकाची संमतीदेखील आवश्यक असल्याचे रामराव गावकर म्हणाले.

शहरात अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात नगरपंचायत अपयशी ठरत आहे. त्यामुळे या बांधकामांवर लवकरात लवकर कारवाई करावी, असे रामचंद्र ठाकूर यांनी सूचविले. सभेत अनेक विषयांवरुन सत्ताधारी व विरोधकांत शाब्दिक वादंगाचे प्रसंग
घडले.

हेही वाचा

Back to top button