नाशिक मनपा निवडणुकीत मनसेचे इंजिन ताकदीने धावणार, मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या सूचना | पुढारी

नाशिक मनपा निवडणुकीत मनसेचे इंजिन ताकदीने धावणार, मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसेचे इंजिन पूर्ण ताकदीने धावणार असून, निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या नाशिकच्या मनसैनिकांना दिल्या आहेत. यामुळे आता भाजपबरोबरच्या युतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मनसैनिकांच्या या बैठकीत नाशिकच्या पदाधिकार्‍यांनी 170 इच्छुकांची यादी राज ठाकरेंना सादर केली. नाशिकसह 18 महापालिकांच्या निवडणुकांसाठी मनसे पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. गुरुवारी (दि.24) ठाकरे यांनी मनसेच्या नाशिकमधील प्रमुख पदाधिकार्‍यांना मुंबईत बोलावून निवडणूक तयारीची माहिती घेतली.

सत्ताधारी भाजप तसेच विरोधक असलेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद, भाजपने केलेली कामे, आश्वासनांची पूर्ततेची माहिती घेत ठाकरेंनी गेल्या पंचवार्षिक काळात मनसेने केलेली कामे, प्रकल्पांची झालेली वाताहत याचाही आढावा घेतला. महापालिकेचा गड पुन्हा एकदा काबीज करण्याचे व त्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे आदेश ठाकरेंंनी दिले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, सचिन भोसले, सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, नितीन साळवे, विक्रम कदम, योगेश लभडे कामिनी दोंदे, नितीन माळी, अरुणा पाटील आदी उपस्थित होते.

अमित ठाकरेंचा नाशिक दौरा…
नाशिकची जबाबदारी सोपविलेल्या मनसेचे युवानेते अमित ठाकरे पुढील आठवड्यात नाशिकच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते इच्छुकांशी संवाद साधण्याबरोबरच निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे उपस्थित असतील.

हेही वाचा :

Back to top button