सातारा :स्वराज्य योद्धयांच्या वंशजांचा खा. उदयनराजेंच्या हस्ते सन्मान | पुढारी

सातारा :स्वराज्य योद्धयांच्या वंशजांचा खा. उदयनराजेंच्या हस्ते सन्मान

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा
राजधानी सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य स्थापनेत मोलाचे योगदान देणार्‍या शूरवीर मावळ्यांच्या वंशजांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत स्वराज्य योद्धयांच्या व मावळ्यांच्या वंशजांना मानपत्र देवून गौरवण्यात आले. सातार्‍यातील गांधी मैदानावर आयोजित कार्यक्रमात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वराज्य निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणार्‍या मावळ्यांच्या वंशजांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी खा. उदयनराजे म्हणाले, स्वराज्यातून लोकशाहीची निर्मिती झाली. आपल्या जाज्वल्य इतिहासाचा विसर पडू देता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून जिवाची पर्वा न करणार स्वराज्य निर्मितीत योगदान देणारे खरे ‘सुपरहिरो’ असल्याचे सांगत त्यांनी मावळ्यांची शाळा उपक्रम जाहीर केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणसभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, संग्राम बर्गे, नगरसेवक किशोर शिंदे, पंकज चव्हाण तसेच खा. उदयनराजे भोसले मित्र समुहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली. मोनिका गोळे यांनी दांडपट्टा, तलवारी, लाठी-काठी अशा शिवकालीन साहसी खेळ व प्रात्यक्षिकांतून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

Back to top button