नाशिक : जिल्हा परिषद निधी नियोजनावरून राष्ट्रवादी सदस्यांत खदखद? | पुढारी

नाशिक : जिल्हा परिषद निधी नियोजनावरून राष्ट्रवादी सदस्यांत खदखद?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेचा प्रारूप आराखडा सादर झाल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मात्र, अंतिम टप्प्यात निधी नियोजनावरून वादंग होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद सेसचे रखडलेले नियोजन व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचे झालेल्या असमान वाटपावरुन सदस्यांमध्ये नाराजी आहे. यातही राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत एक गट या झालेल्या असमान वाटपावर आक्रमक झाला असल्याचे समजते.

जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकार्‍यांची मुदत 20 मार्चला संपुष्टात येणार आहे. सध्या सदस्य व पदाधिकार्‍यांकडून कामे उरकण्याची धावपळ सुरू आहे. फेब—ुवारी संपत आलेला असतानादेखील सदस्यांच्या हक्काचे सेसचे नियोजन झालेले नाही. सदस्य सेसचे नियोजन कधी होणार, अशी विचारणा करत आहे. मात्र, त्यांना प्रतिसाद दिला जात नसल्याने सदस्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

सेसचे वाटप ठराविक सदस्यांना वाटप करण्याची तयारी काही पदाधिकार्‍यांकडून सुरू असल्याची कुणकुण सदस्यांना लागल्याने, सदस्य सावध झाले आहेत. याबाबत काही सदस्यांनी प्रशासनाकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

पालकमंत्र्यांकडे करणार तक्रार
नियोजनात अनेक सदस्यांवर अन्याय झाला असल्याची बात सदस्यांसह प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची तयारी तसेच विभागीय आयुक्तांकडे झालेल्या असमान वाटपाची तक्रार करण्याची तयारी राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी केली आहे. उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती हे राष्ट्रवादीचे असून, सदस्यांना न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करीत पालकमंत्री भुजबळ यांच्याकडेदेखील याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button