नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील निफाड व नाशिक या तालुक्यांमध्ये जवळपास तीन लाख हेक्टरवर ऊस तोडणीपासून वंचित आहेत. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, ऊस जवळपास अठरा महिन्यांचे होऊन त्यांना तुरे फुटले आहे. मात्र, शेतकर्यांना कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे गावोगावी चित्र आहे. यामुळे शेतकर्यांना आपल्या जिल्ह्यातील कारखान्यांचे महत्त्व पटू लागले आहे.
नाशिक जिल्ह्यात एकेकाळी नाशिक साखर कारखाना, निफाड साखर कारखाना, रानवड साखर कारखाना, कादवा साखर कारखाना, वसंतरावदादा साखर कारखाना, रावळगाव साखर कारखाना, गिरणा साखर कारखाना कार्यरत होते. मात्र, त्यातील केवळ कादवा कारखाना सुस्थितीत असून गिरणा, नाशिक कारखाने बंद पडले आहेत. रानवड, वसाका व रावळगाव कारखाने खासगी व्यक्तींना चालवण्यास देण्यात आले आहेत. नाशिक कारखाना बंद असल्यामुळे नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ऊस उत्पादकांना संगमनेर सहकारी साखर कारखान्यावर अवलंबून राहावे लागत आहे. निफाड तालुक्यातील रानवड कारखाना सुरू असला तरी त्याची गाळप क्षमता कमी असल्यामुळे निफाड तालुक्यातील उसासाठी तो पुरेसा नाही. निफाड कारखाना बंद असल्यामुळे निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक कोळपेवाडी, संगमनेर, प्रवरानगर या बाहेरच्या जिल्ह्यातील कारखान्यांबरोबरच कादवा व द्वारकाधीश या कारखान्यांच्या भरवशावर ऊस लागवड करतात.
यंदा सहकार क्षेत्रातील निवडणुका असल्यामुळे कोळपेवाडी, प्रवरा व संगमनेर या सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या सभासद शेतकर्यांच्या ऊस तोडणीला प्राधान्य दिले आहे. यामुळे निफाड तालुक्यातील जवळपास दीड लाख मेट्रिक टन ऊसतोडीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उसाला फुटले तुरे
शिल्लक ऊस पंधरा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा झाल्यामुळे त्याला तुरे फुटले असून, शेतकर्यांनी पाणी देणेही बंद केले आहे. यामुळे उसामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. आधीच तुर्यांमुळे उसाचे वजन घटण्याचा धोका असतानाच उंदीर उसाच्या मुळ्या कुरतडत असल्याने ऊस वाळून जात आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सर्व ऊस तोडणी होणार
नाशिक जिल्ह्यातील ऊस तोडणीबाबत प्रवरा व संगमनेर कारखान्यांच्या गट कार्यालयाशी 'पुढारी'च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता सर्व ऊस तोडला जाईल. शेतकर्यांनी काहीही काळजी करण्याचे कारण नाही, अशा शब्दांत तेथील अधिकार्यांनी उत्तरे दिली. तसेच निफाड तालुक्यात गुर्हाळाच्या उसाबाबत काही समस्या असल्याचेही नमूद केले.