धुळे : धनूर येथील पुतळा प्रकरण भोवले ; पोलीस पाटील, ग्रामसेविका निलंबित | पुढारी

धुळे : धनूर येथील पुतळा प्रकरण भोवले ; पोलीस पाटील, ग्रामसेविका निलंबित

धुळे पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील धनुर येथील पुतळा प्रकरण ग्रामसेविका आणि पोलीस पाटील यांना भोवले आहे. अनधिकृतपणे पुतळा बसवल्या प्रकरणी व बसवल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला न दिल्याचा ठपका ठेवत या दोघांना उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत.

धुळे तालुक्यातील धनुर ग्रामपंचायती नजीक ग्रामस्थांनी चबुतऱ्यावर अश्वारूढ पुतळा बसवला. मात्र ही बाब निदर्शनास आल्याने प्रशासनाने अनधिकृतपणे पुतळा बसवण्याची भूमिका घेत ग्रामपंचायतीला नोटीस बजावली. यानंतर पोलीस बळाचा वापर करीत पुतळा हटवण्यासाठीची कार्यवाही सुरू केली. परिणामी ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये वाद होऊन गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यात आमदार कुणाल पाटील व शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी गावात धाव घेत आंदोलन करणाऱ्या महिला व नागरिकांची समजूत काढली. प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबर आमदार कुणाल पाटील यांनी चर्चा करीत पुतळा हटवण्याची कार्यवाही थांबवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी ग्रामस्थांना देण्याचे सुचवले. त्यानुसार पुतळा हटवणे स्थगित करण्यात आले.

दरम्यान हे प्रकरण आता पोलीस पाटील आणि ग्रामसेविका यांना भोवले आहे. धनूरचे पोलीस पाटील संदेश रोहिदास पाटील यांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटीस अन्वये लेखी खुलासा सादर करण्याचे कळविल्याने पाटील यांनी लेखी खुलासा सादर केला. मात्र हा खुलासा प्रशासनाने अमान्य केला आहे. त्याचप्रमाणे संदेश पाटील यांना पदावरून तात्काळ निलंबित केल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढले आहेत. दरम्यान याच प्रकरणांमध्ये ग्रामसेविका सुरेखा भिवसन ढोले यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसमध्ये ढोले यांनी धनुर ग्रामपंचायतीमध्ये 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करणे आवश्यक असताना त्या कुणाचीही परवानगी न घेता मुख्यालय सोडून गेल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद केले आहे.

जयंती साजरी करण्याबाबत धनुर ग्रामपंचायतीत त्यांनी कोणतेही नियोजन केल्याचे दिसून आले नाही. विशेषतः याच कालावधीमध्ये गावठाणच्या जागेवर अनधिकृतरित्या पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. यासाठी संबंधितांनी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा पुतळा बसवण्यात आला. ही बाब ग्रामसेविका ढोले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे असताना त्यांनी दुर्लक्ष केल्याची बाब नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी केलेला खुलासा देखील प्रशासनाने अमान्य करीत यांना निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. या निलंबनाच्या कालावधीत त्यांना पंचायत समिती येथील मुख्यालयात थांबावे लागणार आहे.

हेही वाचा ;

Back to top button