रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या दृष्टीकोनातून अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महत्वपूर्ण ठरेल : शरद पवार | पुढारी

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या दृष्टीकोनातून अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महत्वपूर्ण ठरेल : शरद पवार

अलिबाग, पुढारी वृत्तसेवा : रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या दृष्टीकोनातून अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी बोलताना व्यक्त केला आहे. उसर (अलिबाग) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. त्यावेळी उसर येथील प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन खासदार शरद पवार हे बोलत होते. उसर येथे झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

शरद पवार पूढे बोलताना म्हणाले की, एखादे महाविद्यालय काढणे हे खूप अवघड असते.  त्यासाठी शासनाला मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यात वैद्यकीय महाविद्यालय काढणे म्हणजे एक छोटेस शहरच वसवण्यासारखे असते. परंतू रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, राज्य सरकार आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ते उभे करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याकरिता या सर्वांचे अभिनंदन करतो असे ते म्‍हणाले. इमारतीचे भूमीपूजन सोहळा होत आहे, मात्र त्या आधी ६० ते ७० विद्यार्थ्यांना प्रवेश देउन प्रत्यक्ष महाविद्यालय सुरु देखील करण्यात आले आहे, हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगीतले.

भूमीपूजन प्रसंगी ऑनलाईल बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्‍हणाले, छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे भूमिपुजन होत आहे. शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयी सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय उभे करत आहोत असे सांगीतले. या ठिकाणी काम करत असताना, विविध मागण्या अनेकजण करत असतात. नुसत्या मागण्या करून काही होत नाही त्याच्या पुर्णत्वासाठी पाठपुरावा करावा लागतो. आदिती तटकरे यांनी याचा खुप पाठपुरावा केला असे म्‍हणत त्‍यांचे कौतुक केले.
गेल्या दोन वर्षात रुग्णालयांचे नुतनीकरण, नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन, श्रेणीवर्धनाचे जास्तीत जास्त काम महाराष्ट्रात झाले आहे.

आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करावी लागली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली. मुंबई- पुण्याच्या सीमा लाभलेल्या या जिल्ह्याला चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न तसेच उद्योग व्यवसायाचा विकास करतांना निरोगी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लसीकरण वाढवा कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. असे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. साथ शिखरावर असताना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील पण आता लाट कमी होत असताना लसीकरण वाढवणे गरजेचे.

लसीकरणानंतरही कोरोना लागण होते पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचवण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची. अपघातग्रस्त भागात ट्रॉमा केअर सेंटर उभे करत आहोत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. ज्यांचे या रुग्णालय उभारणीस सहकार्य लाभले त्या सर्वांना धन्यवाद. रुग्णालय इमारत लवकरात लवकर बांधून हे रुग्णालय सुरु होईल हे पाहिले जावे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, खासदार सुनिल तटकरे. आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ .महेंद्र कुरा आदी मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचलं का 

Back to top button