नाशिक : शहराच्या प्रवेशद्वारांवर आता लवकरच सेल्फी पॉइंट | पुढारी

नाशिक : शहराच्या प्रवेशद्वारांवर आता लवकरच सेल्फी पॉइंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक शहरात येणारे प्रवासी, पर्यटक तसेच भाविक यांना शहराची ओळख निर्माण व्हावी तसेच नाशिककरांनाही मनोरंजनाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महापालिका शहराच्या प्रवेशद्वारांवर तसेच मुख्य चौकांच्या ठिकाणी सीएसआर उपक्रमाअंतर्गत सेल्फी पॉइंट उभारणार आहे. सेल्फी पॉइंटच्या जागेसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

नाशिक शहर धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. दर 12 वर्षांनी या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. दक्षिण काशी म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते. त्यामुळे नाशिक शहराला धार्मिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे. शहराचे नैसर्गिक सौंदर्य, हवामान इतर शहरांच्या तुलनेत अधिक आल्हाददायक आणि आरोग्यदायी आहे. त्र्यंबक, वणी, शिर्डीसारख्या धार्मिक स्थळांना जोडणारे हे शहर विकसित होणार्‍या इतर शहरांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर आहे. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहत लाभलेल्या या शहरालगत एचएएल, भारत प्रतिभूती मुद्रणालयसारख्या शासकीय आस्थापनांमुळे देखील शहराला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

मंत्र, यंत्रभूमी आणि आता तंत्रभूमी म्हणूनदेखील शहर नावारूपाला येऊ पाहत आहे. देश-विदेशातील भाविक, पर्यटक नाशिक शहरात दररोज येत असतात. त्यादृष्टीने नाशिक महापालिका शहराच्या प्रवेशद्वारांवर तसेच मुख्य चौकांच्या ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जागा निश्चितीसाठी सर्वेक्षण केले जात आहे. सुमारे 20 ते 22 ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारले जाणार आहेत.

सेल्फी पॉइंटकरिता शहरातीलच व्यापारी, उद्योजक, खासगी रुग्णालये, शैक्षणिक संस्थांना महापालिकेतर्फे आवाहन केले जाणार आहे. सीएसआर फंडाद्वारे निधी उपलब्ध करून सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे.
– कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button