लता मंगेशकर : आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार ; देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

लता मंगेशकर : आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार ; देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृतीशी सुरु असलेली झुंज आज विसावली आहे. त्यांचे आज ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी बहु अवयव निकामी झाल्याने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती.

लता मंगेशकर यांच्या पश्चात तीन बहिणी आहेत. प्रख्यात गायिका आशा भोसले, संगीतकार मीना खडीकर, गायिका उषा मंगेशकर, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आहेत.

दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

लता दीदी यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी साडे बारा वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या नाजूक प्रकृती झाल्यानंतर कालपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दिग्गजांची रांग लागली होती.

आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही पोहोचल्या. सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

लतादीदींना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनानंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांचे व्हेंटिलेटर तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र शनिवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले.

काल केंद्रीय मंत्री पियूष गोयल, लतादीदींचे बंधू आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदींनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयास भेट देऊन लतादीदींच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे विचारणा केली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी दुपारी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आशा भोसले यांनी देखील ब्रीच कॅन्डी येथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news