नाशिक : ‘खाकी’तली माणुसकी ! निराधार वृद्धाची रक्कम चोरीस गेली म्हणून स्वत: पोलीस अधीक्षकांनीच दिली | पुढारी

नाशिक : 'खाकी'तली माणुसकी ! निराधार वृद्धाची रक्कम चोरीस गेली म्हणून स्वत: पोलीस अधीक्षकांनीच दिली

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा :  चोरी किंवा अत्याचार सारख्या आपबीती मध्ये अडकलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात खेटे घालावे लागतात आणि तो कसा धुत्कारला जातो, याचे अनेक किस्से जाहीर होत असतात. परंतु पोलीस दलातील अधिकारी माणुसकीचा ओलावा जपून असतात; याचा प्रचिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी केलेल्या एका मदत कार्यातून आली. 50 हजाराची रक्कम हातातून चोरीस गेली म्हणून ढसाढसा रडणाऱ्या वृद्धाचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि बातम्या पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी तातडीने त्या वृद्धाला पोलीस दलाकडून आर्थिक आणि मानसिक आधार मिळवून दिला.

ही घटना अशी की, पदम हारचंद कोळी वय वर्षे ७५ वर्षे रा.डामरखेडा ता.शहादा हे संजय गांधी निराधार योजनेच्या मदतीवर अवलंबून असलेले वृद्ध गृहस्थ. त्यातच पत्नीस कोरोना झाला. तिच्या उपचाराच्या खर्चामुळे हवालदील झालेला प्रपंच. या साऱ्यामुळे संसाराचा गाडा मोडकळीस आलेला. पत्नी कोरोनातून बाहेर आलीच नाही व गतवर्षी ती साथ सोडून निघून गेली. वृद्धापकाळात त्याचे जगणे आणखीच हलाखीचे आणि दर्दभरे झाले.

पत्नीचे कोरोनामुळे निधन झाल्याने शासकीय योजनेतून ५० हजार रु. मंजूर झाल्याचे समजले आणि आयुष्याच्या संध्याकाळी सरकारी मदतीच्या रुपाने आशेचा किरण गवसल्याचा या वृद्धाला भास झाला. काल धावतच तो प्रकाशा येथील स्टेट बॅंकेत गेला. ते ५० हजार त्याने बॅंकेतून काढून घेतले. पैशाची पिशवी पत्नीच्या आठवणीने ओलावलेल्या डोळ्यांना लावली. घरी परततांना पत्नीच्या आठवणीने गळ्याशी दाटलेला आंवंढा गिळण्यासाठी पाणी पिण्यासाठी एका हॅाटेलवजा टपरीवर थांबला.

सरकारी दिलासा मिळाल्याने तो थोडा रिलॅक्स झाला होता. तेवढ्यात चोरट्याने डाव साधला. क्षणात पैशाची पिशवी गायब झाली. आयुष्यात पहिल्यांदा इतके पैसे एकदम पाहिलेले.. पण तेही काही क्षणाचेच सोबती ठरले. पत्‍नीच्या आठवणीतील  अर्धवट गिळलेला हुंदका पुन्हा गळ्यातून बाहेर पडला. ढसाढसा रडला. आयुष्यातल्या अखेरच्या दिवसात दारिद्र्यासोबत वाट्याला आलेली हतबलता मात्र तशीच गिळून तो नशीबाला दोष देत मार्गस्थ झाला.

याबाबत आज वृत्तपत्रात बातमी आलेली  पाहिल्‍यानंतर नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांनी त्‍यांना आपलेसमोर समक्ष हजर करण्याचे शहादा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना आदेश दिले. त्‍यानंतर तातडीने शहादा पो.स्टे.च्या पोलीस गाडीतून त्‍यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. परंतु कालच्या धक्क्यातून अद्याप ते सावरेलेला नव्हते. आणि पोलीस स्टेशनला काय तक्रारही दाखल झाली, त्‍यात आता थेट एस.पी.नीच का बोलावले म्हणून ते आणखीच घाबरून गेले.

परंतु तेथे गेल्यावर त्‍यांना आणखी एक मोठा धक्‍का बसला परंतु हा अतिशय गोड धक्का होता. पोलीस अधीक्षकांनी ५० हजार रु. त्यांच्या हातात ठेवले. ‘तुमचे चोरीला गेलेले पैसे आम्ही शोधून देऊच परंतु माझ्या सहकारी पोलिसांनी तुमच्यासाठी वर्गणी काढून पैसे जमवले आहेत त्याचा स्वीकार करा” म्हणून खुद्द अधीक्षकांनी विनंती केली. पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून जमा केलेले पैसे स्विकारताना त्‍यांना रडू कोसळले.

एका वृद्धाचे लुटलेले समाधान वर्गणी काढून परत करताना उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनाही गहिवरून आले.
नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधिक्षक विजय पवार,शहाद्याचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, वाचक अर्जुन पटले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या वृद्धास ही मोलाची आणि माणुसकीची मदत करुन पोलीसातील माणुसकीचा परिचय करुन दिला. “आता चार दिवस जास्त जगेन” असे म्हणत ते ७५ वर्षांचे वृद्ध शहादा पो.स्टे.च्या गाडीत स्वतःहून जाऊन बसले मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता ! नंदुरबार पोलीसही अश्रू नयनांनी त्याच्या आनंदात सहभागी झाले होते !!

हे ही वाचलं का 

Back to top button