नाशिक : पोलिस ठाण्याजवळील मद्यविक्रीचे दुकान फोडले ; लाखाची दारु चोरीला | पुढारी

नाशिक : पोलिस ठाण्याजवळील मद्यविक्रीचे दुकान फोडले ; लाखाची दारु चोरीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गंगापूर पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानात चोरट्याने घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्याने मद्यविक्रीचे दुकान फाेडून तेथून सुमारे एक लाख रुपयांचे मद्य व रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात मद्यविक्रीची दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच असून, यावेळेस गंगापूर पोलिस ठाण्याच्या जवळीलच मद्यविक्रीचे दुकान फोडण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील समाधान वाइन मार्ट या मद्यविक्रीचे दुकान फोडण्यात आले आहे. दुकानाचे व्यवस्थापक रवींद्र विठ्ठल साळी (५२, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने २९ ते ३० जानेवारीदरम्यान रात्रीच्या वेळी दुकानाच्या ग्रिलच्या दरवाजाच्या लोखंडी पट्ट्या उचकटवून शटरचे कोंडे तोडले. त्यानंतर चोरटे दुकानात शिरले व त्यांनी दुकानातील ८५ हजार रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या चोरून नेल्या.

त्याचप्रमाणे दुकानातील १३ हजार ५०० रुपयांची रोकडही लंपास केली आहे. सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात चोरटा एकटाच होता व त्याने मास्क आणि टोपी घातल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मात्र, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी दिली. याआधीही चोरट्यांनी दिंडोरी रोडवरील दोन मद्यविक्रीची दुकाने फोडून मद्यसाठा व रोकड चोरून नेली आहे. त्या घटनांमधील चोरट्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नसताना आता थेट पोलिस ठाण्याच्या जवळचे दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसांच्या गस्ती, बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे दिसत आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा ;

Back to top button