खंडित वीजपुरवठ्याने पिकांचे नुकसान | पुढारी

खंडित वीजपुरवठ्याने पिकांचे नुकसान

सातारा : पुढारी वृत्तसेवा

गेल्या 15 दिवसांपासून ग्रामीण भागात वीज बिल थकीत असणार्‍या कृषिपंपांच्या जोडण्या खंडित करण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. 50 टक्के वीज बिल भरले तरच वीज जोडण्या पूर्ववत करण्याचा इशाराच महावितरणने शेतकर्‍यांना दिला आहे. यामुळे पाण्याअभावी पिके जळून नुकसानही होण्याचा धोका आहे.

गेल्या वर्षभरापासून महावितरणकडून सुरुवातीला शेती, व्यावसायिक, घरगुती जोडणी, कृषिपंप यांची वसुली करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी व वसुलीही लवकर होण्यासाठी महावितरणने योजना सुरू करत हप्त्याहप्त्यात थकीत रक्कम भरण्यास सवलत दिली होती. या योजनेला ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने महावितरणची काही प्रमाणात थकीत वसुली झाली. मात्र, त्यानंतर उर्वरित थकीत बिले वसूल न झाल्याने महावितरणने वीजजोडणी तोडण्यास सुरुवात केली.

अवेळी पडणारा पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गतवर्षी दिवाळीचा सण झाल्यानंतरही मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन व ऊसतोडीवरही प्रचंड परिणाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या परिस्थितीतून शेतकरी उभारी घेत असताना महावितरणने कृषिपंपांच्या जोडण्या खंडित करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे.

चुकीची बिले शेतकर्‍यांच्या माथी

महावितरण कंपनी बहुतांश कृषिपंपांच्या मीटरमधील रीडिंग न घेता अंदाजे बिले शेतकर्‍यांच्या माथ्यावर मारत आहे. मीटरमधील रीडिंग व प्रत्यक्षात बिलांवरील रीडिंगमध्ये खूप फरक असल्याचे अनेक बिलांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे महावितरण जादा रीडिंग लावून चुकीच्यापद्धतीची वसुली करत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केलाआहे.

Back to top button