नाशिक : मनपाच्या जागा बिल्डर लॉबीच्या घशात घालण्याचा पुन्हा डाव | पुढारी

नाशिक : मनपाच्या जागा बिल्डर लॉबीच्या घशात घालण्याचा पुन्हा डाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मोक्याच्या मिळकती बीओटीवर विकसित करण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपसह नाशिक मनपा प्रशासनाने पुन्हा अशासकीय ठराव पारीत केल्याची बाब समोर आली असून, प्रशासनाने आणखी चार मिळकती विकसित करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. मनपाच्या या कृतीबाबत शिवसेनेने तीव्र आक्षेप घेत, नाशिक मनपाने शहर बिल्डर लॉबीला विक्रीस काढल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे सावरकरनगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी असलेल्या जागेचाही यात अंतर्भाव असल्याची चर्चा आहे. असे असल्यास भाजप ऐन निवडणूक काळात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

याबाबत नाशिक मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांना विरोधाचे पत्र दिले आहे. नाशिक महापालिकेच्या शहरातील मोक्याच्या 22 मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याबाबत सभागृहाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता, ठराव (क्र. 530) 19 जानेवारी 2021 रोजी मंजूर करण्यात आला. संबंधित मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याच्या गोंडस नावाखाली खासगी मक्तेदाराच्या घशात घालण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने तयार केला असून, त्याला यापूर्वीच कडाडून विरोध केलेला असल्याचे बोरस्ते, शिंदे यांनी म्हटले आहे.

दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी पुन्हा ठराव (क्र. 1187) करून शहरातील शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर, सावरकरनगर, रविवार कारंजा या अत्यंत मोक्याच्या जागा असलेल्या मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रस्तावदेखील अशासकीय ठरावाद्वारे मंजूर केला असून, या मिळकती विकसित करण्याच्या निविदा मनपा प्रशासनाने काढल्याचे निर्दशनास आले आहे. ही बाब अतिशय खेदजनक आहे. शहरातील मोक्याच्या मिळकती मनपाने भविष्याचे नियोजन करून कोट्यवधी रुपये खर्चून संपादित केलेल्या आहेत. या जागा विकसित करताना संबंधित अंतिम लेआउटमधील रहिवाशांना विश्वासात घेणे गरजेचे होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्यादेखील अशाच स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना आहे. असे असताना मनपाने केवळ विशिष्ट विकासकांना हाताशी धरून मनपाच्या मालमत्तांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांनी केला आहे.

.. तर शासनाकडे दाद मागणार
शहरातील मोक्याच्या मिळकती या नागरिकांच्या उपयोगासाठी न येता, केवळ ठराविक मूठभर बिल्डरांच्या घशात जाण्याचा दाट संभव असून, प्रशासनदेखील या कृत्यास मदत करताना दिसत आहे. शहराचा विकास होण्याऐवजी आगामी काळात बकाल स्वरूप येणार आहे. या सर्व कृत्याच्या व संशयास्पद हेतूच्या विरोधात शासनाकडे दाद मागण्याचा इशारा बोरस्ते, शिंदे यांनी दिला आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button