बीजिंग : कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीनने हायपरसोनिक मिसाईलची निर्मिती करून अमेरिकेबरोबरच जगाची डोकेदुखी वाढविली आहे. आता हाच देश 'अल्ट्रा-फास्ट स्पेस प्लेन'ची निर्मिती करून जगाची चिंता आणखी वाढवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
चीनची एक कंपनी अल्ट्रा फास्ट स्पेस प्लेन विकसित करण्याच्या तयारीत आहे. हे प्लेन प्रवाशांना पृथ्वीच्या कोणत्याही भागात घेऊन जाण्यास सक्षम असेल. यासाठी सर्वप्रथम हे स्पेस प्लेन अंतराळात जाईल आणि त्यानंतर पुन्हा पृथ्वीच्या दिशेने झेपावेल.
या विमानासाठी ज्या रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे, त्याचे नाव 'तियानसिंग 1' असे आहे. या रॉकेटसोबत एक लहान प्लेन जोडलेले असेल. रॉकेटच्या मदतीने हे प्लेन अवकाशात पुरेशा उंचीपर्यंत पोहोचल्यानंतर ते रॉकेटपासून वेगळे होईल. त्यानंतर ते ताशी 2600 मैल वेगाने अवकाशातील आपल्या नियोजित स्थळाकडे रवाना होईल.
बीजिंगस्थित 'स्पेस ट्रान्स्पोर्टेशन' कंपनीने हे स्पेसप्लेन बनविण्यास 2018 पासून सुरुवात केली आहे. कंपनीने या विमानाला 'पंख असलेले रॉकेट' असे नाव दिले आहे. पंखांचे हे रॉकेट 2025 पर्यंत लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. टेस्ट प्लाईटमध्ये रॉकेटचे लाँचिंग व लँडिंगही यशस्वी ठरले आहे. मात्र, संपूर्ण स्पेस प्लेनची चाचणी व्हायचे अद्याप बाकी आहे.
जर का या विमानाने ताशी 2671 मैल इतका अतिवेग गाठला तर ते सुपरसॉनिक एअरलाईनर कॉनकॉर्डपेक्षा दुप्पट वेगाने प्रवास करेल. या वेगाने लंडन ते न्यूयॉर्क हा प्रवास अवघ्या तासाभरात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. मात्र, स्पेस प्लेनचा हा चिनी प्लॅन जगाची चिंता वाढवत आहे.
हेही वाचा