नाशिक जिल्हा परिषद : जलसंधारण विभागाच्या बँक खात्यातील 22 लाख रुपये खासगी व्यक्तींच्या खात्यात ; गुन्हा दाखल | पुढारी

नाशिक जिल्हा परिषद : जलसंधारण विभागाच्या बँक खात्यातील 22 लाख रुपये खासगी व्यक्तींच्या खात्यात ; गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील निलंबित कर्मचारी रवींद्र ठाकरे यांच्याविरोधात अखेर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाकरे यांनी जलसंधारण विभागाच्या बँक खात्यातील 22 लाख 15 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने इतर खासगी व्यक्तींच्या खात्यांमध्ये जमा केल्याचे तपासणीत सिद्ध झाल्याने हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने ठाकरे यांच्याकडून ही वर्ग केलेली रक्कम पुन्हा खात्यात भरून घेतल्यानंतर ही कारवाई केली आहे.

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील कर्मचारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे विभागाच्या बँक खाते व कॅशबुकातील नोंदी ठेवण्याचे काम होते. बँक खात्यात रक्कम जमा झाल्यास अथवा इतर खात्यांत वर्ग झाल्यास त्याची कॅशबुकमध्ये नोंद करून त्यावर वरिष्ठांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक असते. मात्र, वरिष्ठांकडून याबाबत कधी विचारणा झाली नाही व ठाकरे यांनीही कॅशबुकवर सही केली नाही.
दरम्यान, मागील ऑगस्टमध्ये ठाकरे यांनी ठेकेदाराकडे एक नस्ती दिल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ठाकरे यांना तातडीने निलंबित केले होते. त्यांच्या निलंबनाच्या काळात दुसर्‍या कर्मचार्‍याकडे पदभार देण्यात आला. यावेळी कॅशबुकवरील नोंदी व खात्यातील रकमा जुळत नसल्याचे त्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिले. मात्र, त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, स्थानिकस्तर लेखापरीक्षणातही हा आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर लेखा व वित्त विभागाने तातडीने हालचाल करीत दोन-तीन सहायक लेखाधिकार्‍यांची नेमणूक करीत मागील तीन वर्षांमधील जलसंधारण विभागाच्या बँक खात्यातील सर्व नोंदींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये रवींद्र ठाकरे यांनी खासगी व्यक्तींच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये वेळोवेळी 22.15 लाख रुपये वर्ग केल्याचे दिसून आले. यानंतर संंबंधित विभागाने ठाकरे यांच्याशी संपर्क साधून ही रक्कम भरून घेण्याचा निर्णय घेतला.

रक्कम पुन्हा जलसंधारणच्या खात्यात
ठाकरे यांनीही गुन्हा कबूल करून संपूर्ण रक्कम पुन्हा जलसंधारण विभागाच्या खात्यात जमा केली. यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला व ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यास याबाबत पत्र लिहून या प्रकरणाची माहिती देत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. बरेच दिवस होऊनही भद्रकाली पोलिस ठाण्याकडून काहीही कार्यवाही होत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर जलसंधारण विभागातील सहायक जलसंधारण अधिकारी रघुनाथ गवळी यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button