नाशिक : शेकोटीपायी तरुणाला खावी लागली तुरुंगाची हवा ; वाचा नेमके असे घडले तरी काय? | पुढारी

नाशिक : शेकोटीपायी तरुणाला खावी लागली तुरुंगाची हवा ; वाचा नेमके असे घडले तरी काय?

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा : सध्या नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडल्याने चौकाचौकांमध्ये शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. यात तरुणमंडळी मात्र आघाडीवर आहेत. अशाचप्रकारे पंचवटीतील एका तरुणाला ही शेकोटी चांगलीच महागात पडली असून, त्याला चक्क तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

घडलेला प्रकार असा की, पंचवटीतील एका इमारतीमधील दोन दुचाकींच्या जाळपोळप्रकरणी पंचवटी पोलिसांकडे फिर्याद दाखल होती. पोलिसांनी या गुन्ह्यातील अज्ञात संशयिताचा कोणताही ठावठिकाणा नसताना कौशल्यपूर्ण पध्दतीने शोध लावला. यात राहुल उर्फ सोनू विनोद वाघेला (१८, रा. मेरी कॉलनी, पंचवटी) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली खरी; मात्र ही घटना कशी घडली हे त्याच्या तोंडून ऐकून पोलिसांनाही काहीवेळ हसू आवरता आले नाही.

रात्री थंडी खूप असल्याने पठ्याने शेकोटीची लाकडे पेटविण्यासाठी कुणाच्या तरी दुचाकीतून पेट्रोल आणण्याचे ठरवले. यासाठी तो जवळच्या इमारतीमध्ये शिरला. या ठिकाणी लावलेल्या एका दुचाकीतील पेट्रोल कागदी ग्लासमध्ये काढताना जमीनीवर सांडले. अशातच खूपच थंडी भरल्याने या तरुणाने सिगारेट ओढण्यासाठी माचिसची काडी पेटविली. सिगारेट पेटवल्यानंतर पेटलेली काडी त्याने जमीनीवर टाकताच सांडलेल्या पेट्रोलचा भडका उडाला. यात त्याने त्याचा जीव वाचवत पळ काढला मात्र आग लागल्याने यामध्ये दोन दुचाकी जळाल्याची कबुली राहुलने पोलिसांना दिली.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, संशयित राहुलने शेकोटीची मजा घेतली की नाही ते माहित नाही, परंतु तुरुंगाची हवा मात्र त्याला खावी लागली आहे. सध्या शहरात थंडी खूप वाढली असली तरी शेकोटी पेटविण्यासाठी तरुणांनी अशाप्रकारे गैरमार्गाचा वापर करू नये, असा संदेशच जणू या घटनेतून समोर आला आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button