जळगाव : वीजपुरवठा खंडित करण्याच्या निर्णयाविरोधात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपचा बैलगाडी मोर्चा | पुढारी

जळगाव : वीजपुरवठा खंडित करण्याच्या निर्णयाविरोधात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपचा बैलगाडी मोर्चा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या महाविरणच्या निर्णयाविरोधात आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जामनेर येथे महावितरण कार्यालयावर राज्य सरकार विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बैलगाड्यांसह शेतकरी सहभागी झाले होते.

जामनेर येथील बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालयातून काल दुपारी 2 वाजेला शेतकरी मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी खाली डोकं वर पाय या सरकारचे करायचं काय अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. बैलगाड्यासह शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसील कार्यालय व महावितरण कार्यालयावर नेण्यात आला.

राज्यातील महाविकासआघाडी सरकारने वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा व कोरोना कालखंडात सर्व सामान्य नागरिकांना आलेले वाढीव वीजबिल माफ करण्यात यावे. अगोदरच विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जनता/शेतकरी कमालीची त्रस्त झालेली आहे. सातत्याने रोहित्र फेल होणे, रोहित्र मिळण्यास विलंब होणे, विलंबाने मिळालेले रोहित्र खराब निघणे, कमी दाबाने विज पुरवठा होणे यासारख्या तक्रारीने जनता/शेतकरी कमालीचे हवालदील झालेले आहे. पिठगिरणी, सार्वजनिक पाणीपुरवठा इ.बाबींवर त्याचा विपरित परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होते. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. अशा तक्रारी यावेेळी करण्यात आल्या.

राज्यात कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती असतांना सुध्दा जनतेला/ शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात वाढीव विज बिल देण्यात आलेले आहेत. परिणामी जनमानसात, शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष आहे. परिस्थिती सुधारली नाही तर नाईलाजाने वीजवितरण कंपनीच्या विरोधात यापेक्षाही मोठया संख्येने आपल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल व होणाऱ्या परिणामास विज वितरण कंपनी जबाबदार राहील. असा इशारा निवेदनातून यावेळी देण्यात आला.

यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या  विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या मोर्चात आ.गिरीश महाजन, चंद्रकांत रामधन बाविस्कर,  दिलीप बळीराम खोडपे, तुकाराम विठोबा निकम, गोविंद मुरलीधर अग्रवाल, छगनराव शामराव झाल्टे, राजधर लहानु पांढरे याच्यासह भाजपचे पदाधिकरी, कार्यकर्त्या, शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

सरकारला आमदार गिरीश महाजन यांचा निर्वाणीचा इशारा
सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही हेच समजत नाही. कोरोना पेक्षा मोठे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. खरीच खरिपाचा हंगाम 100 टक्के गेला. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. यात आता वीज कनेक्शन कापले जात असल्याने कुठलीही पिके घेता येत नाही. शेतकऱ्यांना वीज द्या अन्यथा मोठे आंदोलन शेतकरी करेल असा इशारा देखील आमदार गिरीश महाजन यांनी दिला.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button