हवेली तालुक्यात ‘छुप्या’ युतीमुळे राष्ट्रवादी हाेणार खिळखिळी | पुढारी

हवेली तालुक्यात 'छुप्या' युतीमुळे राष्ट्रवादी हाेणार खिळखिळी

सीताराम लांडगे, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने एका वरिष्ठाच्या इशाऱ्यावरून भाजपच्या प्रदीप कंद यांना रसद पुरविल्याने तालुक्यातील भाजप-राष्ट्रवादीच्या या छुप्या युतीमुळे भविष्यातील राजकारणात राष्ट्रवादी खिळखिळी होणार, असे चित्र पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीतल्या या सूर्याजी पिसाळांची तक्रार पक्षाच्या ‘कोअर कमिटी’कडे करून ही वरिष्ठ नेत्याचीच फूस असल्याने संबंधितांवर कारवाई झालेली नसल्याने भविष्यात हवेली तालुक्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व असून नसल्यासारखे राहणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या हवेली तालुक्यातील नेत्यांची पक्षाशी असलेली निष्ठा उघडपणे पाहायला मिळाली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे भाजपचे अधिकृत उमेदवार होते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कंद यांचा निभाव लागणार नाही, हे जगजाहीर होते; तरीही त्यांनी विजय हा राष्ट्रवादीच्या हातातून खेचून आणला.

त्यांना जिल्ह्यात मिळालेल्या आघाडीचे विश्लेषण झाले. परंतु, हवेली तालुक्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर असतानाही कोणालाही न जुमानता खुलेआम रसद पुरविण्यात आली, याच्या तक्रारी स्थानिक आमदार अशोक पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली; तरीही पक्षाने भाजपशी हातमिळवणी करणाऱ्यांवर अद्याप कारवाई केली नाही. अथवा खुलासा मागण्याचे धाडस केले नाही. पक्षाचे हेच धोरण भविष्यातील राजकारणात घातक असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असतानाही आपल्याच जिल्ह्यात हवेली तालुक्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर खिळखिळे होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या सत्कार समारंभात तर भाजप-राष्ट्रवादीचे एकत्रित जाहीर सत्कार झाले.

राष्ट्रवादीच्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार भाजपने खुलेआम केला. भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांची तालुक्यातील गळाभेट राष्ट्रवादीचे निष्ठावंत खुलेआम पाहत आहेत, याची तक्रार वरिष्ठांकडे केली; तरीही दखल घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर जाहिररीत्या भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो हवेली तालुक्यात पहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार अशोक पवार यांचे फोटो बॅनरवर न छापण्याचे धाडस खुलेआम बिनदिक्कतपणे केले आहे. यावरून हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीची गटबाजी, भाजपशी हातमिळवणी हे भविष्यात मारक ठरणार आहे. राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करून विशिष्ट उमेदवारास मतदान करा, असा सज्जड दम तालुक्यातील काही मतदारांना भरला, असे आता उघड झाले आहे. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या कळपात केव्हाच सामील झाले आहेत. राष्ट्रवादीला घरघर लावण्यात हवेली तालुक्यात भाजप यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button