नाशिक वृक्षतोड : हे झाड तोडू नका’ अशा आशयाची पत्रके चिकटवित पर्यावरणप्रेमी एकवटले | पुढारी

नाशिक वृक्षतोड : हे झाड तोडू नका’ अशा आशयाची पत्रके चिकटवित पर्यावरणप्रेमी एकवटले

नाशिक/सिडको : पुढारी वृत्तसेवा
उंटवाडी ते त्रिमूर्ती चौक रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी महापालिकेने साडेचारशेहून जास्त वृक्षांना नोटीसा चिकटविल्या आहेत. त्याविरोधात पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी चिपकाव आंदोलनांतर्गत त्याच झाडांना न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ असलेले व ‘माननीय उच्च न्यायालयाचा हेतुपुरस्सर अवमान करू नका, हे झाड तोडू नका.’ अशा आशयाची पत्रके चिकटविली आहेत. त्याचप्रमाणे कत्तलीसाठी प्रस्तावित वृक्षांना पर्यावरणप्रेमींनी मिठी मारून प्रशासनाचा विरोध दर्शविला.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांनंतर आता वृक्षतोड चर्चेत

सिडकोतील प्रस्तावित उड्डाणपुलामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांनंतर आता वृक्षतोड चर्चेत आली आहे. महापालिकेने रस्त्यालगतच्या 450 पेक्षा जास्त वृक्षांना छाटणी, कापण्याबाबतच्या नोटिसा चिकटविल्या आहेत. त्यावर पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी हरकती घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (दि. 21) म्हसोबा मंदिर येथील 200 वर्षे जुन्या वटवृक्षाच्या संवर्धनार्थ सोशल मीडियावर आवाज उठविण्यात आला. त्याची दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा केली.

प्रस्तावित उड्डाणपुलाचा आराखडा बदलून, वृक्षांची कत्तल टाळण्याचे आवाहन मनपा आयुक्तांना ना. ठाकरे यांनी केले. त्यामुळे नाशिककरांच्या लढ्याला यश मिळाले असले, तरी महापालिकेने बजाविलेल्या नोटीसांमुळे नाशिककर पुन्हा आक्रमक झालेले दिसले. पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी या नोटिसींना उत्तर देण्यासाठी न्यायालयाच्या आदेशातील मजकूर व वृक्षतोड न करण्याचे आवाहन करीत तशी पत्रके मनपा नोटिसींजवळ चिकटविली. रविवारी (दि.23) दुपारच्या सुमारास पर्यावरणप्रेमी मनोज साठे, मनीष बाविस्कर, अंबरीश मोरे, अरविंद निकुंभ, चंदू पाटील आदी नाशिककरांनी वृक्षांवर चिकटविलेल्या महापालिकेच्या नोटिसांजवळच पत्रक चिकटवत मोहीम सुरू केली. यासह त्या वृक्षांना मिठी मारीत संवर्धनासाठी सदैव लढण्याची शपथही त्यांनी घेतली.

आंदोलकांना नोटीस

शहरात जमावबंदीचा आदेश लागू असल्याने, विनापरवानगी आंदोलने, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येत नाहीत. त्यामुळे ‘चिपकावो’ आंदोलन करणार्‍यांना गर्दी न करण्यासह परवानगी घेण्याबाबत नोटिसा बजाविण्यात आल्या. दरम्यान, याबाबत कोणताही गुन्हा दाखल नसून, केवळ नोटिसा दिल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिली.

महापालिकेच्या पथकासोबत काही दिवसांपूर्वी वृक्षतोडीसंदर्भात संयुक्त पाहणी दौरा केला होता. त्यावेळी या मार्गावरील 33 वृक्ष न तोडण्याबाबत निर्णय झाला आहे. त्या वृक्षांवर तशी खूणदेखील करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याच वृक्षांना महापालिकेने नोटिसा चिकटवल्या आहेत. त्यामुळे आम्ही चिपकावो मोहीम राबवून आमची भूमिका मांडली.
– मनोज साठे, पर्यावरणप्रेमी

हे ही वाचा : 

Back to top button