नाशिक : सेवानिवृत्तांची एसटीकडे पाठ ; 25 पैकी अवघे तिघे कामावर रुजू | पुढारी

नाशिक : सेवानिवृत्तांची एसटीकडे पाठ ; 25 पैकी अवघे तिघे कामावर रुजू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शासन विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेला कर्मचार्‍यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी भरती प्रक्रियाही पार पाडण्यात आली होती. नाशिक विभागात 25 सेवानिवृत्तांनी अर्ज केले होते, त्यापैकी अवघे 3 कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यामुळे संपकरी कर्मचार्‍यांपाठोपाठ सेवानिवृत्तांनी एसटी प्रशासनाच्या आवाहनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी बेमुदत कामबंद अर्थात अघोषित संप पुकारला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली वेतनवाढ नाकारत कर्मचारी संपावर ठाम आहे. संपकरी कर्मचारी कामावर परतण्यास तयार नसल्याने एसटी प्रशासनाने प्रवासी वाहतूक सेवा पूर्ववत करण्यासाठी कंबर कसली आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नियुक्तीसह सेवानिवृत्तांना पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र, त्यात एसटी प्रशासनाला फारसे यश आले नाही.

दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी चार कंत्राटदारांमार्फत कर्मचारी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक विभागाला 50 कंत्राटी कर्मचारी मिळणार आहेत, तर 25 सेवानिवृत्तांनी सेवा देण्याची तयारी दाखविली आहे. अर्ज छाननी प्रक्रियानंतर वैद्यकीय तपासणी करून संबंधित सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना कामावर रुजू करून घेतले जाणार होते. मात्र, सेवानिवृत्तांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने एसटी प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

दबावाचा आरोप
सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसह संपातीलही काही कर्मचारी कामावर परतण्यास तयार आहेत. मात्र, काही संपकरी कर्मचारी विशेषत: निलंबित आणि बडतर्फ कर्मचारी दबाव टाकत आहेत. सेवा बजाविण्याची तयारी दाखविणार्‍या कर्मचार्‍यांच्या थेट घरी जाऊन धमकावत असल्याचा आरोप करीत, त्यामुळेच कर्मचार्‍यांच्या उपस्थितीवर परिणाम झाल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा :

Back to top button