मुंबई; पुढारी ऑनलाईन
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. अशा परिस्थितीत लता मंगेशकर यांच्या ट्विटर हँडलवरून त्रासदायक बातम्या थांबवण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही ट्विट करून लोकांना अफवा पसरवू नका असे आवाहन केले.
लता मंगेशकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले आहे की, 'तुम्हा सर्वांना विनंती आहे की, विचलित करणाऱ्या अफवा पसरवू नका. ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. प्रती समदानी यांनी अपडेट देताना सांगितले की, लता दीदी आधीच्या तुलनेत सुधारणा दिसून येत आहे आणि त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आम्ही त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्याची आणि घरी परतण्यासाठी प्रार्थना करत आहोत.
स्मृती इराणी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लता मंगेशकर यांच्या डॉक्टरांच्या वक्तव्याची एक नोट शेअर केली आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले की, 'लता दीदींच्या कुटुंबीयांकडून अफवा पसरवू नका अशी विनंती आहे. त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून लवकरच त्या बरी होऊन देवाच्या आशीर्वादाने घरी परतणार आहेत. कोणतीही अटकळ टाळा आणि लता दीदींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत राहा.
९३ वर्षीय लता मंगेशकर यांनी आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत विविध भारतीय भाषांमध्ये ३० हजार गाणी गायली आहेत. २००१ मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेल्या लता मंगेशकर यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
हे ही वाचलं का ?