मुख्यमंत्री आज शिवसैनिकांना कोणता ‘ठाकरी’ संदेश देणार ? | पुढारी

मुख्यमंत्री आज शिवसैनिकांना कोणता 'ठाकरी' संदेश देणार ?

मुंबई ; पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून प्रकृतीमुळे क्वचितपणे दिसून आले आहेत. आज (ता.२३) बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यामुळे आज शिवसैनिकांना मुख्यमंत्री कोणता ठाकरी संदेश देणार याची उत्सुकता आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूकही तोंडावर असल्याने मुख्यमंत्री काय बोलणार याचीही उत्सुकता आहे. मुख्यमंत्री घरी असण्यावरून सातत्याने भाजपकडून बोचरी टीका केली जात आहे. त्यालाही या माध्यमातून उत्तर देणार का याचीही चर्चा आहे.

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण

दरम्यान, माझगाव येथे महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ भव्य पुतळा महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे रविवार दि. 23 जानेवारीला सायंकाळी सात वाजता होणार आहे.

महाराणा प्रताप यांचा मुंबईतील हा पहिला अश्वारुढ पुतळा आहे. मुंबईत महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील रावराणे समाजाची मागणी होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्यासह वस्तुसंग्रहालयही उभारण्यात आले आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनात 23 एप्रिल 2018 मध्ये झालेल्या बैठकीत माझगाव येथील महाराणा प्रताप चौकाचे सुशोभीकरण व पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. हा चौक नेस्बिट मार्ग आणि शिवदास चापसी मार्ग जंक्शनवर आहे. हे जंक्शन पाच वाहतूक बेटाने वेढलेलेआहे.

प्रस्तावाला 5 मार्च 2019 मध्ये मंजुरी मिळाली. धुळे येथील शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी हा पुतळा साकारला आहे. 20 फूट उंचीच्या चौथर्‍यावर,16 फूट उंचीचा हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. साडेचार टन वजनी आणि कांस्याने बनविलेला हा पुतळा भालाधारी व अश्वारूढ आहे. आकर्षक विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे.

वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना बेस्ट बसस्थानकाजवळील एका बेटावर जुने कारंजे आढळून आले. त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित भित्तिशिल्प आजूबाजूच्या त्रिकोणी बेटांवर लावण्यात आले आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button