

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गोवंडी परिसरातील शिवाजी नगर, चिखलवाडी मधील इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये शुक्रवार (दि २९ जुलै) सकाळी एकाच घरात चार जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. शकील जलील खान(वय ३४) या तरुणाने त्याची पत्नी राजीया खान (वय २८) आणि ७ वर्षाचा मुलगा सरफराज व ३ वर्षाची मुलगी अतीफा यांच्यावर विषप्रयोग करून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली.
शिवाजी नगरच्या चिखलवाडी मध्ये एक छोटेसे किराणा मालाचे दुकान चालवणारा शकील हा शांत आणि आनंदी स्वभावाचा व्यक्ती होता. आठ वर्षांपूर्वी त्याने रजिया शी लग्न केले. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले हे दाम्पत्य तीन चार वर्षांपूर्वी गोवंडीत रहायला आले होते. त्यांना दोन गोंडस मूले ही झाली. हसत खेळत असलेले हे कुटुंब शुक्रवारी सकाळी उध्वस्त झाले. सकाळी फोन उचलत नाही म्हणून शकीलचा भाऊ सुफीयन शकीलच्या घरी आला होता. मात्र दरवाजा ठोकून ही दरवाजा उघडत नाही म्हणून त्याने आणि आजूबाजूच्या रहिवाश्यांनी दरवाजा तोडला. या वेळी त्याला हे चार मृतदेह आढळले आणि विभागात खळबळ उडाली. सुफियांनने झालेली घटना पोलिसांना कळवली.
शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चार ही मृतदेह आणि त्याच्या बाजूला पडलेली फिनाईल सदृश द्रवाची बाटली ताब्यात घेतली आहे. मात्र शकीलचे कधी घरी भांडण होत नव्हते. आजू बाजूच्या रहिवाश्यांशी आणि कुटुंबाशी ही तो चांगला वागत असे, अशी माहिती त्याच्या शेजारील रहिवासी देत आहेत. त्याच्या घरात कोणतीही चिठ्ठी अथवा या घटनेचे कारण देणारी चिठ्ठी ही भेटलेली नाही. त्यामुळे नेमके शकील ने हे का केले? कसे केले ? कारणे काय? याचा अजून शोध लागलेला नाही. संपूर्ण कुटुंबच संपल्याने पोलिसांसमोर या घटनेचे कारण शोधण्याचे मोठे आवाहन आहे.
या प्रकरणी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनसाठी पाठवले असून अजून तरी कोणते ही कारण समोर आलेले नाही, मात्र आमचा तपास सुरू आहे असे शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी सांगितले.