

डोंबिवली – पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली मधील अनधिकृत बांधकामे काही भागात पाणी तुंबण्याला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सर्व परिस्थितीने पालिका प्रशासनाच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे.
त्याचबरोबर अनधिकृत बांधकामे तितकीच जबाबदार असल्याचे दिसून येते. याचा सर्वात जास्त फटका २७ गावांना अनधिकृत बांधकामामुळे बसला आहे.
डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामे जोरात सुरु असून रिकाम्या भूखंडावर विकासक इमारत बांधतात. पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची ओरड डोंबिवली करांकडून होत आहे.
काही भागात पावसाळ्यात पाण्याचा याच कारणामुळे निचरा होत नसल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
रविवारी दुपारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारी सकाळी काही वेळ विश्रांती घेतली होती.
टीपटीप पडणाऱ्या पावसाने सकाळी ११ नंतर जोरदार बॅटिंगला सुरुवात केल्याने सखल भागात पाणी साचले होते.
अधिक वाचा :
स्टेशनबाहेरील परिसर जलमय झाला होता. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील रस्ते आणि नाले मोठे केल्यास दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर कायमचा तोडगा निघेल अशी माहिती `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी सांगितले.
डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथे पाणी साचल्याने येथील नागरिकांनी अनधिकृत बांधकामामुळे पाणी साचण्यास ही बाब जबाबदार असल्याचा आरोप केला.
डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोड येथील कोपर अप्पर स्टेशनजवळील अण्णानगर झोपडपट्टीत गुडघाभर पाणी साचले होते.
पालिका प्रशासन नालेसफाई योग्य करत नसल्याने दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे येथील रहिवाश्यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा, महाराष्ट्रनगर, गावदेवी मंदिर नावगाव भागातील विविध ठिकाणी पाणी साचल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्या नेतृत्वाखाली नाले सफाई करण्यात आली.
अधिक वाचा :
या कामात शाखाअध्यक्ष कदम भोईर, नितीश दीपनाईक,मनसे महापालिका कामगार सेनेचे सहचिटणीस प्रीतेश म्हामुणकर,संदीप ( रमा ) म्हात्रे, सागरमुळ्ये,संकेत सावंत, समीर करंबेळकर, समीर चाळके, समीर जयस्वाल, अमित सुके, सुमित परब,आदि मनसैनिकांनीही सहभाग घेतला.
तर डोंबिवली पूर्वेकडील न्यू कल्याण रोड येथील हॉटेल फूड व्हिलेज समोरील रस्त्यावरील खड्डा महेश चव्हाण या नागरिकाने रॅबिट टाकून बुजवला.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : विस्टाडोम कोचची निसर्गरम्य सफर